सोयगाव – सोयगाव सह तालुक्यात जरंडी, बनोटी, गोंदेगाव, घोसला आदी परिसरात गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान विजांच्या कडकडाटात मुसळधार पावसाने थैमान घातले होते. दरम्यान जरंडी शिवारात कापूस वेचणी करणाऱ्या तीन महिलांच्या अंगावर अचानक वीज कोसळून तीन महिला गंभीर भाजल्याची घटना शुक्रवारी १८ रोजी सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास घडली आहे.

सोयगाव परिसरात शुक्रवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटात मुसळधार पावसाने शेतातील कापूस भिजला आहे. दरम्यान जरंडी शिवारात गट क्र-१५५ मध्ये स्वतःच्या मालकीच्या शेतात कापूस वेचणी करणाऱ्या शोभा बाई रामेश्वर चौधरी (वय ५२) रविना मुकेश चौधरी (वय २७) व योगिता विष्णू वाघ (वय ३२ तिन्ही रा-जरंडी) या तिन्ही महिलांच्या अंगावर वीज कोसळून त्या तिघेही भाजल्या आहे. त्यापैकी योगिता वाघ व शोभाबाई चौधरी या किरकोळ जखमी झाल्या असून रविना चौधरी या गंभीर जखमी आहे.
त्या तिघांना खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली होती. अद्यापही महसूल विभागाने घटनेचा पंचनामा केलेला नव्हता. उपचार करून तिघेही महिलांना रात्री उशिरा घरी आणले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याने खासगी वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
दरम्यान शुक्रवारी सायंकाळी माळेगाव पिंपरी शिवारात ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे. त्यामुळे माळेगाव, पिंपरी शिवारात कपाशी भिजून खराब झाली आहे. मुसळधार पावसाने वेचणी करून शेतीच्या बांधावर ठेवलेल्या कपाशीचे गाठोडे ही ओले झाले आहे. त्यामुळे घरी घेऊन जाणाराही कापूस शेतात भिजला आहे.
परतीच्या पावसाने पिकांना फटका
परतीच्या पावसाच्या दोन दिवसांनंतर नंतर सोयगाव सह तालुक्यात पुन्हा पावसाने थैमान घातले. त्यामुळे कपाशी सह मका, सोयाबीन, ज्वारी व बाजरी या पिकांची नुकसान झाले आहे. मक्याच्या पिकांना कोंब फुटून पुन्हा मका उगवला आहे. तर कपाशीच्या कैऱ्या सडून झाडावरच कुजलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे सोयगाव तालुक्यात कपाशीच्या उत्पन्नात घट आली असल्याने परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे.


