नाशिकमध्ये तणावाचं वातावरण ; बंदला विरोध केला म्हणून दोन गटात वाद ;

नाशिक –

बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात आज नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाकडून नाशिक बंदची हाक देण्यात आली होती. यावेळी निषेध मोर्चा काढण्यात आला. सकल हिंदू समाजाच्या आवाहनाला अनेक व्यापाऱ्यांनी आणि दुकानदारांनी सकारात्मक प्रतिसाद देत दुकानं बंद ठेवली होती. पण नाशिकच्या भद्रकाली परिसरात काही दुकानं सुरु होती. सकल हिंदू समाजाची रॅली आज १६ रोजी दुपारी भद्रकाली परिसरात पोहोचली.

यावेळी आंदोलकांनी दुकानदारांना दुकान बंद करण्याचं आवाहन केलं. पण काही दुकानदारांनी त्यास विरोध केला. त्यामुळे नाशिकच्या भद्रकाली परिसरात दोन गटात वाद निर्माण झाला. भद्रकाली परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे यशस्वी प्रयत्न केले.

या मोर्चाला उत्सफुर्त असा प्रतिसाद मिळाला. शेकडो तरुण या मोर्चात सहभागी झाले. आंदोलकांकडून जय श्रीरामाच्या घोषणा करण्यात आल्या. तसेच छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणाबाजी करण्यात येत होती. या दरम्यान हा मोर्चा नाशिकच्या भद्रकाली परिसरात पोहोचला तेव्हा शांततेत असलेल्या मोर्चाला काही काळ वेगळं रुप मिळालं.

शहरात कोणतीही तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून सर्वोतोपरी काळजी घेतली जात होती. पण नाशिकच्या भद्रकाली परिसरात सकल हिंदू समाजाचा मोर्चा पोहोचला तेव्हा दुकानं बंद करण्यावरुन दोन गटात वाद झाला. यावेळी परिस्थिती निवाळण्यासाठी पोलिसांनी गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मोर्चा पुन्हा पुढच्या दिशेला निघाली. यावेळी पोलिसांनी या मोर्चाला एकाच ठिकाणी स्थानबद्ध केलं. मोर्चा आता इथेच थांबवण्यात यावा, अशी विनंती पोलिसांनी आंदोलकांना केली. पण सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते मोर्चा पूर्ण करण्यावर ठाम आहेत. सध्या पोलीस आणि आंदोलकांमध्ये चर्चा सुरु आहे.