भुसावळ –
ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार हा सर्वत्र मैत्री दिवस म्हणून साजरा केला जातो. भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचे धावपटू दर मंगळवार, गुरुवार व रविवार असे आठवड्यातून तीन दिवस एकत्र धावण्याचा सराव करीत असतात. त्याशिवाय हे सर्व पुरुष व महिला धावपटू देशभरातील विविध मॅरेथॉनमध्ये सोबत सहभागी होत असतात. साहजिकच या सर्व धावपटूंमध्ये मैत्रीचे नाते अधिक वृद्धिंगत झालेले आहे. रविवारी मैत्री दिवस असल्यामुळे वेगळ्या पद्धतीने या सर्व धावपटूंनी मैत्री दिवस साजरा केला. त्यासाठी त्यांनी नियोजित केल्याप्रमाणे आपल्या मित्र किंवा मैत्रिणींसोबत समूहाने एकत्र हे सर्व धावपटू दहा किलोमीटर अंतर धावले. विशेष म्हणजे यातील काही धावपटूंनी अगदी सुरुवातीपासून ते शेवटच्या अंतरापर्यंत आपल्या मित्राचे हातात हात घेऊन ही धावपटूंनी पूर्ण केली. खूप जोरात पाऊस सुरू असून देखील या धावपटूंनी आपला दृढनिश्चय कायम ठेवून आपले निर्धारित अंतर एकत्रितरित्या पूर्ण केले. त्यासाठी हे सर्व धावपटू पहाटे 5.15 वाजता रेल्वे क्रीडांगणासमोरील श्रीकृष्णचंद्र सभागृहाच्या शेजारील जागेत जमले होते. सर्वप्रथम प्रवीण फालक यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी वॉर्म अप केले. त्यानंतर आरपीडी रस्त्यावर दहा किलोमीटर किंवा त्यापेक्षा अधिकचे अंतर या धावपटूंनी एकत्र धावायला सुरुवात केली. सुरुवातीला हवामानात असलेली आद्रता धावपटूंची कसोटी बघत होती. परंतु त्यानंतर काही वेळाने रिमझिम पावसाला सुरुवात झाली व या आपल्या मित्र-मैत्रिणींसोबतची ही धाव या धावपटूंसाठी अधिक आनंददायी झाली. परंतु मैदानाकडे परत येताना मात्र खूप जोराचा पाऊस सुरू झाला. यावेळी या सर्व धावपटूंनी अतिशय निर्धाराने आपली धावणे पूर्ण केले व त्यानंतर भर पावसात प्रवीण पाटील यांच्यासोबत सर्व धावपटूंनी स्ट्रेचिंग एक्सरसाइज देखील पूर्ण केली.
मैत्रीचे नाते अधिक वृद्धिंगत करण्यासाठी सर्वच महिला धावपटूंनी आपल्या मैत्रिणींसाठी फ्रेंडशिप बँड आणलेले होते. अगदी सकाळपासूनच या सर्व महिला धावपटूंच्या चेहऱ्यावर त्यामुळे वेगळा आनंद होता. मैत्रीचे हे धागे बांधताना सर्व धावपटू एकमेकांना सुदृढ आरोग्यासाठी शुभेच्छा देत होते व पुढील सर्व मॅरेथॉन आपण सोबत जाऊ व खूप चांगल्या वेळेत ती मॅरेथॉन पूर्ण करू असे आश्वासन देखील एकमेकांना यावेळी देत होते.
या उपक्रमात स्वाती व प्रवीण फालक, डॉ वर्षा व डॉ सुनिल वाडीले, गरिमा व सुयश न्याती, सरला व महेंद्र पाटील, जयश्री व जितेंद्र चौधरी, पुष्पा व संजय तिवारी, पुष्पा व प्रशांत वंजारी या दांपत्यांनी एकत्र धावून पती-पत्नीचे नाते देखील मैत्रीचे असले पाहिजे अशा आपल्या कृतीतून दाखवून दिले. यावेळी जितेंद्र चौधरी यांनी सलग 100 दिवस धावण्याचा मानस पूर्ण केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन देखील करण्यात आले. याशिवाय विजय फिरके, संजय भदाणे, संतोष घाडगे व तरुण बिरीया या मित्रांनी एकत्र धावून 21 किलोमीटरचे अंतर पार केले. त्याचबरोबर प्रवीण वारके, निलेश पाटील, रणजीत खरारे, मंगेश चंदन यांनी देखील एकत्रित 16 किलोमीटर अंतर धावून मैत्री दिवस साजरा केला. त्याचबरोबर संतोष मोटवानी व सुरेश सहानी यांनी सोबत तसेच , सारंग चौधरी, डॉ उमाकांत चौधरी यांनी देखील एकत्रित दहा किमी अंतर धावून पूर्ण केले. याशिवाय प्रकाश अटवानी, सचिन मनवानी व कैलास छाब्रा यांनी एकत्रितरित्या पाच किमी अंतर धावून पूर्ण केले.तसेच नवोदित धावपटू मंगेश यावलकर, प्रशांत चौधरी, श्रीकांत जोशी, पवन चव्हाण व गणेश तिवारी यांनी देखील एकत्रित 10 किमी अंतर पूर्ण केले. महिलांमध्ये डॉ चारुलता पाटील, विनिता शुक्ला, सुनीता वाघमारे, पुष्पलता चौधरी, विजया निकम, डाॅ मीनाक्षी चौधरी, सुनिता रंजन सिंग, शीला कश्यप, अर्चना चौधरी, माधुरी चौधरी, कीर्ती मोतळकर,गुंजन गुप्ता, एकता भगत, हेमांगी चौधरी,सीमा वायकर या मैत्रिणींनी एकत्रित होऊन दहा किलोमीटरचे अंतर अगदी आनंदात धावून पूर्ण केले.




