आदर्श व्यक्तिमत्व व्यसनमुक्ती शक्य –

प्रा. डॉ. दयाघन एस राणे
भुसावळ

 आपण एखादं बी पेरतो, त्या आधी जमिनीची चांगली मशागत करतो.  योग्य वेळ पाहून पेरणी करतो. वेळच्या वेळी पाणी आणि खते देतो. बी रुजते, झाड तयार होते. ठराविक वेळी झाडाला फुले येतात, फळधारणा ही होते. ..... पण एखादा हुशार माळी प्रत्येक फुलाचे फळात रूपांतर होऊ देत नाही काही फळे तो काढून टाकतो. झाडाचे योग्य आणि पूर्ण पोषण झाल्यावर मगच फळधारणा होऊ देतो. त्या झाडावरची फळे मग रसाळ आणि उत्तम स्वादाची असतात. आमच्या यावल तालुक्यात केळी ची लागवड मोठ्या प्रमाणात असते. केळीच्या बागांमधून फिरलो तर अनेक केळी च्या फण्या खाली टाकून दिलेल्या दिसतात. अश्याच माझ्या एका मित्राच्या केळीच्या बागेत केलेल्या फेर फटक्यात मी माझ्या मित्राला विचारलं, ही केळी अशी का पडलेली आहेत. तो म्हणाला, केळीच्या घडात फक्त वरच्या काही फण्या ठेवायच्या असतात. म्हणजे केळीची प्रत, वजन आणि गुणवत्ता उत्तम येते. व्यक्तिमत्वाचे ही तसेच आहे. त्याची प्रत आणि गुणवत्ता उत्तम राहिली म्हणजे व्यक्तिमत्त्व आदर्श बनत असतं 
   आदर्श व्यक्तिमत्व होण्यासाठी काही गोष्टींचा निर्धार पूर्वक त्याग करावा लागतो - केळीच्या बागेतील काढून टाकलेल्या फण्यां सारखा. काही संस्कार करावे लागतात - बागेला खते आणि फवारे देतो तसे. काही सवयी वृध्दींगत कराव्या लागतात - केळीच्या घडा  मध्ये राखलेल्या केळींसारख्या, योग्य वेळी योग्य प्रक्रिया कराव्या लागतात - जिजाऊनी योग्य वेळी शिवबा वर केलेल्या संस्कारांच्या प्रक्रियां सारख्या. मग तयार होते संवेदनशील आणि आदर्श व्यक्तिमत्व. 
  जमिनीची मशागत आणि व्यक्तिमत्त्वावरील संस्कार ह्या समांतर गोष्टी आहेत. जिजाऊंनी शिवबा वर लहान वयात केलेल्या संस्कारांमधून स्वराज्याच स्फुल्लिंग पेटवल गेलं आणि एक आदर्श राजा जगासमोर आला. शिवबाची युद्धनीती, समाजकारण, राजकारण, माता आणि भगिनीं बद्दलचा आदर, केवळ वाखाणण्याजोगा च नव्हता तर तो आजही अनुकरणीय आहे. म्हणून ते चारित्र्य संपन्न आदर्श व्यक्तिमत्व आहे. अशा व्यक्तीमत्वांसाठी काहीही अशक्य नसते. ..... व्यसनमुक्ती सारखी कठीण गोष्ट ही ते साध्य करू शकतात.  शिवाजी राजे, बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, हे सारे  युगपुरुष होते. पण आपल्या सारख्या सर्वसामान्य व्यक्तींना ही आपल व्यक्तिमत्व आदर्श बनवता येईल. 
   आदर्श व्यक्तिमत्व होण्यासाठी काही गोष्टींचा समावेश निर्धार पूर्वक आपल्या वागणुकीत केला म्हणजे आपली वाटचाल आदर्श व्यक्तिमत्व होण्यासाठी योग्य ठरते. मुळात जन्माला येणे ही सर्वांसाठी सारखीच प्रक्रिया असली तरी आपण आपले आयुष्य कसे व्यतीत करतो, यावर व्यक्तिमत्व अवलंबून असते. लहानपणात झालेले संस्कार महत्वाचे असले तरी नंतरची असलेली आपली वागणूक महत्वाची ठरते. कुमारावस्था आणि किशोरावस्था  या दोन्ही काळातला आपल्या व्यक्तिमत्त्वाचा दृश्य भाग म्हणजे आपली सुडौल शरीर संपदा, आपण साध्य केलेली एखादी कला, आपला मनमिळाऊ पणा, निगर्विता, संकटांशी चार हात करण्याची मानसिकता, धैर्य आणि सहनशिलता, आत्मविश्वास, वर्तमानाचे भान, इतरांबद्दल असणारा आदर, आपले राहणीमान आणि सर्वात महत्वाचे म्हणजे चारित्र्य. हे गुण आपले व्यक्तिमत्व आदर्श बनवतात. 
  आता आपण आदर्श व्यक्तिमत्त्वाच्या माध्यमातून व्यसनमुक्ती कशी शक्य होऊ शकते या गोष्टी चा विचार करू. 

आपली संगत चांगली ठेवली, म्हणजे आपण निर्व्यसनी मित्रांच्या सहवासात राहू, थोडक्यात आपण स्वतःला व्यसनापासून दूर ठेवू शकू.
रोज नियमित फिरायला जाणे, व्यायाम करणे या माध्यमातून आपले शरीर सुडौल ठेवू, “सुदृढ शरीरात सुंदर मन निवास करते” असे आपल्या पूर्वजांनी म्हटलेले आहे. विविध विषयांवर वाचन लेखन चिंतन करून आपण आपले ज्ञान अद्ययावत ठेवू शकू. वाद्य वादन, लेखन, अभिनय अश्या पद्धतीची एखादी कला आपल्या जीवनात विकसित करू. ज्या कलेच्या माध्यमांतून आपल्याला सामाजिक जागृतीच्या प्रबोधन कार्यक्रमात सहभागी होता येईल. वाचनाच्या व्यासंगामुळे आपण एखाद्या व्यसनाच्या संदर्भातील सखोल माहिती गोळा करून लोकांपर्यंत पोहोचवू शकू आणि त्या माध्यमातून व्यसनांच्या धोक्यांबाबत जनजागृती करणे आपल्याला सुलभ होईल. मनमिळाऊ पणा आणि निगर्विता या दोन गुणांमुळे आपण समाजाच्या प्रत्येक स्तरातील व्यक्तींपर्यंत पोहोचू शकू. त्यांच्याशी योग्य संवाद साधू शकू या द्वारे व्यसनमुक्ती करण्यासाठी पोषक वातावरण आपल्याला तयार करता येईल.
व्यसनमुक्तीच्या उद्दिष्टासाठी समाजातील तळागाळापर्यंत आणि व्यसनी व्यक्तींच्या जवळ पोहोचण्यासाठी मनमिळाऊ पणा आणि निगर्विता हे दोन गुण अतिशय आवश्यक आहेत. व्यसनी व्यक्ती काही वेळा आक्रमक होऊ शकतात, “तुम्हाला काय करायचं आहे, आम्ही आमच्या पैशाने व्यसन करतो” असे सांगण्या पर्यंत त्यांची मजल जाते. काही वेळा अमली पदर्थांची विक्री करणारे आणि त्यांच्या साखळी शी दोन हात करायची वेळ ही येवू शकते, अर्थात असे फार कमी वेळा होते. पूर्वी तंबाखू च्या संदर्भात जनजागृती करण्यासाठी स्वामीनारायण संप्रदायाचे संत जेव्हा जायचे आणि लोकांना तंबाखूच्या दुष्परिणामांची माहिती द्यायचे, तेव्हा तंबाखू उत्पादकांकडून त्या संतांवर हल्ले चढवले जायचे. अशा वेळी परिस्थिती नुसार वागण्याचे भान आणि प्रसंगावधान असणे, अशा परिस्थितीला सामोरे जाण्याचे धैर्य अंगी असणे, सहनशीलता अंगी असणे हे अत्यंत आवश्यक आहे. आपण हे कार्य यशस्वीपणे पूर्ण करू शकू हा आत्मविश्वास अंगी असला म्हणजे आपण करीत असलेल्या कार्याचे अर्धे यश तिथेच मिळेल. व्यसनमुक्तीचा ह्या लढ्यात वर्तमानाचे भान असणे अत्यंत आवश्यक असते. सातत्याने अमली पदार्थ, घेणाऱ्यांची मानसिकता आणि प्रयोगशीलता ही सतत बदलत असते. व्यसना साठी लागणारा पदार्थ जास्त जास्त घेण्याकडे किंवा नशा जास्त मिळवण्याची त्याची मानसिकता वाढत असते, तसतसा व्यसनी व्यक्तीच्या वर्तना मध्ये ही बदल होत असतो. म्हणून या क्षेत्रात सातत्याने काय बदल होत असतात. कोणकोणते पदार्थ नव्याने अमली पदार्थांच्या गटात सामील होत आहेत. किंवा कोणता नवीन पदार्थ अमली पदार्थ म्हणून वापरात येत आहे, या पदार्थांचे शरीरावर काय परिणाम होत आहेत हे वर्तमानाचे भान असल्याशिवाय कळणे शक्य नसते.
व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात कार्य करीत असताना आपल्याला व्यसनी व्यक्ती बद्दल केवळ सहानुभूती असून चालत नाही, त्या व्यक्ती बद्दल आपल्याला आदर असला तरच आपल्या भावना त्या व्यक्ती पर्यंत पोहोचणे शक्य होते. अर्थात तो नशेच्या अंमलाखाली नसेल तर त्याचा उपयोग होतो. त्या भावनांचा विचार करून तो व्यक्ती काही काळ व्यसनापासून दूर राहण्याचा विचार ही करू शकतो. पण जेव्हा त्याची तलफ त्याच्या सहनशक्तीच्या पलीकडे जाते तेव्हा मात्र तो पुन्हा मादक पदार्थाचं सेवन करतो. त्याच्या सकारात्मक विचारांचा कालावधी आपण आपली वागणूक, त्याच्या बद्दलची सहानुभूती, त्याच्या बद्दलचा आदर यांच्या माध्यमातून वाढवू शकतो. सर्वात महत्वाचे असते ते आपले रहाणीमान आणि चारित्र्य. आपले रहाणीमान, आपली वागणूक आणि आपले चारित्र्य जर चांगले असेल तर ते इतरांसाठी प्रेरक असते. व्यसनी व्यक्तीला नशेत असताना ही एखाद्या आदर्श व्यक्तीमत्त्वाबाबत आदरच असतो. त्यांच्या प्रभावाचा ही त्याच्यावर परिणाम होतोच. म्हणून आपले व्यक्तिमत्त्व प्रेरक असणे गरजेचे आहे
आपण व्यसन मुक्तीच्या क्षेत्रात काम करीत असतो म्हणजे उच्च प्रतीची रिस्क असणाऱ्या क्षेत्रात काम करीत असतो. त्या मध्ये आपल्याला व्यसनी व्यक्ती बद्दल, आदर, सहानुभूती ही ठेवायची असते, त्याच वेळी स्वतःला सुरक्षित ही ठेवायचे असते. परंतु जर आपले व्यक्तिमत्व आदर्श असेल तर आदर्श व्यक्तिमत्वाचे निकष असणारे जे गुण आपल्या वागणुकी मध्ये दिसले पाहिजेत. ते गुण तसे आपल्या व्यक्तिमत्त्वात नसतील तर ते प्रयत्नपूर्वक आत्मसात करावे लागतील. जे गुण आपल्या व्यक्तिमत्त्वात आहेतच त्यांना वृध्दींगत करावे लागतील. आणि त्या पलीकडे आपल्या चारित्र्याला अडसर ठरणाऱ्या सवयी किंवा गुणांना आपल्या वर्तनामधून बाद ही करावे लागेल. या दरम्यान आपली भूमिका एखाद्या शिल्पकारा सारखी असली पाहिजे. उत्कृष्ठ शिल्पकराला दगडात दडलेली मूर्ती दिसत असते तो केवळ त्या दगडात असलेला जास्तीचा भाग काढून टाकत असतो. त्या प्रमाणे आपल्या व्यक्तिमत्त्वाला आदर्श बनवत असताना आपल्याला आपल्या सवयीचं टेलरिंग करावं लागेल. तर आपण व्यसनी व्यक्तीला व्यसनमुक्तीच्या मार्गाकडे चालण्याची प्रेरणा देवू शकू.
म्हणून एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व आदर्श व्यक्तिमत्व असेल तर अश्या व्यक्तीला व्यसनमुक्ती च शिवधनुष्य पेलण सहज शक्य होईल.

लेखक ….प्रा. डॉ दयाघन एस राणे
9834831870
dsrane07@gmail.com