भुसावळ : हतनूर धरणाचे आवर्तन सुटत नसल्याने वरणगाव शहरात उन्हाळ्यापूर्वी पाणीटंचाईच्या झळा बसत होत्या. गेल्या 13 दिवसांपासून पिण्याचे पाणी नसल्याने वरणगावकरांचे हंडाभर पाण्यासाठी हाल होत होते. या संदर्भात राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, आमदार संजय सावकारे यांच्याकडे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी निवेदन देवून चर्चा केली होती तर भुसावळ रेल्वे प्रशासन, दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्रासह पाणी वापर संस्थांनी बंधार्यातील जलसाठा कमी झाल्याने आवर्तन सोडण्याची मागणी केली होती. जिल्हा प्रशासनाने मागण्यांची दखल घेत सोमवार, 4 मार्च रोजी दुपारी 12 वाजता चार दिवसांसाठी एकूण तीन हजार सहाशे क्यूसेस आवर्तन सोडल्याने नागरीकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

वरणगावकरांना मोठा दिलासा
वरणगावातील पाणीप्रश्नी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी चर्चा केली होती व तातडीने पाणी समस्या सोडविण्यात येण्याबाबत सूचनाही केली होती. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सोमवारी सकाळी पाटबंधारे विभागाला या संदर्भात आढावा घेण्याचे सूचवले होते तर कठोरा येथील जॅकवेलची माजी नगराध्यक्ष सुनील काळे, भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी, गोलू राणे, मिलिंद भैसे, नाना चौधरी, गणेश तळेले, मुक्तार खान, निलेश झांबरे यांच्यासह भाजपा पदाधिकार्यांनी पाहणीदेखील केली होती. मागणीची दखल घेत आवर्तन सोडण्यात आल्याने वरगणावकरांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत.
भुसावळकरांचा पाणीप्रश्न मिटला
भुसावळ पालिकेच्या बंधारीतील जलपातळी घटल्याने शहरातही पाण्याची समस्या निर्माण झाली होती तर बिगर सिंचन पाणीवापर संस्थांनी बंधार्यातील जलपातळी घटल्याने पाटबंधारे उपविभाग, यावल यांच्याकडे आवर्तनाची मागणी केली होती तर भुसावळ विभागीय रेल्वे, दीपनगर औष्णिक केंद्रालाही असलेली पाण्याची आवश्यकता पाहता सोमवारी दुपारी हतनूर धरणातून प्रति दिन एक हजार डे क्यूसेस प्रमाणे आवर्तन सोडण्यात आले आहे. 7 मार्चपर्यंत हे आवर्तन राहणार असून सुरूवातीचे तीन दिवस प्रति दिन एक हजार तर अखेरच्या दिवशी 600 डे क्यूसेस प्रमाणे आवर्तन सोडण्यात येईल, अशी माहिती धरणावरील सूत्रांनी दिली. हतनूरचे पाणी पालिकेच्या तापी बंधार्यात गुरुवारी वा शुक्रवारी पोहोचणार आहे.
दूषित पाण्याचा प्रश्न सुटणार
हतनूर धरणाच्या आवर्तनामुळे भुसावळ शहरातील रेल्वे व पालिकेचे दोन्ही बंधारे ओव्हरफ्लो होणार आहेत शिवाय पालिका बंधार्याची जलपातळी घसरल्याने शहरात पिवळ्या व दूषित पाणीपुरवठा होत होता मात्र आवर्तनाचे पाणी पोहोचल्यानंतर दूषित पाण्याची समस्या सुटणार असल्याचे पाणीपुरवठा विभागातील सूत्रांनी सांगितले. यंदाच्या उन्हाळ्यातील हे दुसरे आवर्तन आहे. बंधार्यात आगामी 40 दिवसांचा जलसाठा शिल्लक असेल. दरम्यान, जॅकवेलची ब्लिचींग पावडर टाकून स्वच्छता करण्यात आली असून जलपातळी वाढताच पाण्याची उचल वाढेल, असे सूत्रांनी सांगितले.


