यावल – प्राथमिक व माध्यमिक विभागासाठी काही क्षमताक्षेत्रे ठरवून देण्यात आली आहे. त्यानुसार अध्यापनाकडून अध्ययनाकडे किंबहुना स्वयंअध्ययनाकडे वाटचाल करताना अध्ययन कौशल्य विकसित केल्यास अभ्यास सुलभ होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन बालभारतीच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. जगदीश पाटील यांनी केले.

यावल येथील जगन्नाथ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शशिकांत सखाराम चौधरी कन्या माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा रजनी चौधरी तर प्रमुख अतिथी म्हणून चेअरमन सुवर्णा चौधरी, सदस्य कांचन चौधरी, मुख्याध्यापिका नलिनी पाटील, विद्यार्थीनी प्रतिनिधी टिना अस्वार यांची उपस्थिती होती. प्रारंभी सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागत गीत म्हटले. मुख्याध्यापिका नलिनी पाटील यांनी प्रमुख वक्ते डॉ. जगदीश पाटील यांचा परिचय करून दिला. ‘अभ्यास आणि मी’ या विषयावरील व्याख्यानात बोलताना डॉ. जगदीश पाटील म्हणाले की, क्षमता म्हणजे काहीतरी करण्याची कुवत असते. ही क्षमता उपजत अथवा संपादित देखील असू शकते. तर कौशल्य हे काहीतरी वेगळे करण्याची कुवत असल्याने आपण ते मिळवू शकतो. क्षमता व कौशल्यांची पायाभरणी करण्याच्या हेतूनेच पाठ्यपुस्तकाची रचना करण्यात आली आहे. प्राथमिकसाठी श्रवण, वाचन, लेखन, भाषण-संभाषण ही क्षमता क्षेत्रे तर उच्च प्राथमिकसाठी वरील चार क्षेत्रांसोबतच भाषाभ्यास व अध्ययन कौशल्य यांचा समावेश होतो. शिकण्याचे परिणाम म्हणजेच अध्ययन निष्पत्ती ठरवण्यासाठी उद्दिष्ट व कौशल्यांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यात ज्ञान, आकलन, उपयोजन, विश्लेषण, मूल्यमापन व नवनिर्मिती या पायऱ्यांचा समावेश होतो. पूर्वी शिकण्याचे मूल्यमापन केले जाई. आता शिकण्यासाठी मूल्यमापन केले जाते. भविष्यात स्वतःच्या शिकण्याच्या प्रक्रियेचे स्वतः मूल्यमापन विद्यार्थ्यांना करावे लागणार आहे. मूल्यमापनात स्वमत आणि अभिव्यक्ती या संकल्पनांचा समावेश करण्यात आला असून त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आलेले उत्तमोत्तम अनुभव व त्यांना विचार करण्याची संधी दिल्याने त्यांच्यात सृजनशीलता निर्माण होऊ शकेल. कंटाळा न करता अभ्यास करता यावा म्हणजेच आनंददायी अभ्यासासाठी या सर्व बाबी समजून घेणे गरजेचे असल्याचेही डॉ. जगदीश पाटील यांनी सांगितले. सूत्रसंचालन शिक्षिका भारती नेहेते यांनी तर आभार शिक्षिका संगीता बारी यांनी मानले. यावेळी शैलजा चौधरी, स्निग्धा जोशी, शोभा इंगळे, अर्चना वानखेडे, देविका पाटील आदी शिक्षिका उपस्थित होत्या. व्याख्यानाचा लाभ पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनींनी घेतला.


