भुसावळ – भारतातच नव्हे तर जगप्रसिद्ध असलेली टाटा मुंबई मॅरेथॉन रविवारी मोठ्या उत्साहात पार पडली.कोरोना कालखंडानंतर दोन वर्षांनी झालेल्या या स्पर्धेत 42 किमी पूर्ण मॅरेथॉन, 21 किमी अर्ध मॅरेथॉन, 10 किमी रन, ड्रीम रन, सीनियर सिटीजन रन आदी वेगवेगळ्या गटात तब्बल 55 हजाराहून अधिक धावपटू एकत्र धावले. वेगवेगळ्या गटासाठी ठराविक अंतर व वेळेची चाळणी चाचणी पूर्ण केलेल्या धावपटूस या स्पर्धेत सहभागाची संधी मिळत असते. या प्रतिष्ठित मॅरेथॉनमध्ये भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या तब्बल 20 धावपटूंनी यशस्वी सहभाग नोंदविला. यात 42 किमीच्या पूर्ण मॅरेथॉन गटात संजय भदाणे, विजय फिरके, तरुण बिरीया, मुकेश चौधरी, संदीप कुमार वर्मा, उमेश घुले, डॉ. तुषार पाटील, युवराज सूर्यवंशी, प्रदीप सोलंकी, गणसिंग पाटील, प्रवीण वारके या 11 धावपटूंनी यशस्वी सहभाग नोंदविला. शिवाय 21 किमी अर्ध मॅरेथॉन मध्ये डॉ. नीलिमा नेहेते, डॉ. चारुलता पाटील, डॉ. स्वाती फालक, राजेंद्र ठाकूर, जितेंद्र चौधरी, सुरेश सहानी, संतोष मोटवानी, सुधाकर सनांसे या 8 धावपटूंनी तर 10 किमी रन मध्ये मीना नेरकर यांनी यशस्वी सहभाग नोंदविला. 42 किमी गटात नाव नोंदणी केलेल्या प्रवीण फालक व प्रवीण पाटील प्रकृती अस्वास्थामुळे प्रत्यक्ष सहभागी होऊ शकले नाहीत परंतु स्पर्धेच्या दिवशी संपूर्ण वेळ त्यांनी आपल्या धावपटूंसोबत राहणे पसंत केले. त्याचबरोबर इसाक गवळी व संदीप सुरवाडे हे धावपटू देखील सहभागी धावपटूंचा उत्साह वाढवण्यासाठी खास भुसावळहून आले होते. 21 किमी ची मॅरेथॉन माहीम येथील रेती बंदर येथून तर 42 किमी मॅरेथॉन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाबाहेरून ठीक 5.15 वाजता सुरू झाली. धावायला सुरुवात केल्यानंतर कधी आपण वरळी सी लिंक वर पोहोचू व एखादे धावतानाचे छायाचित्र घेऊन अशी भावना प्रत्येक धावपटूच्या मनात होती. रस्त्याच्या दुतर्फा फक्त आणि फक्त धावपटू असे चित्र होते. एरवी वाहनांच्या प्रदूषणाने गुदमरलेले मुंबईचे रस्ते धावपटूंच्या बुटांचे स्वागत करीत होते. पोलीस यंत्रणा व महापालिका प्रशासन संपूर्ण व्यवस्था चोख बजावीत होते. अशा गुळगुळीत रस्त्यांवर धावणाऱ्या धावपटूंच्या समुद्रात आज प्रचंड मोठ्या प्रमाणावर भरती आली होती की काय असा भास धावपटूंना होत होता. रस्त्याच्या दुतर्फा आबालवृद्ध मुंबईकर धावपटूंसाठी पेयजल, बिस्किट, चॉकलेट, वेगवेगळे फळे आदींची व्यवस्था करताना ‘हर दिल मुंबई’ या मॅरेथॉनच्या ब्रीद वाक्याचे आठवण करून देत होते. माहीम वरून निघालेले २१ किलोमीटरचे धावपटू पूर्ण मॅरेथॉनच्या आपल्या सहकाऱ्यांना विरुद्ध बाजूने धावताना बघून एकच जल्लोष करीत होते. आपल्या नवीन तिरंगा रंगाचे टी-शर्ट बघून भुसावळचे धावपटू ‘भारत माता की जय’ ‘वंदे मातरम’ अशा घोषणा देऊन वातावरण देशभक्तीमय करत होते.
सुरुवात वेगवेगळ्या ठिकाणाहून असली तरी मुंबईच्या आझाद मैदानावर सर्व धावपटूंचा रन संपवून जेव्हा पदक गळ्यात पडले त्यावेळी गेल्या चार महिन्यांपासून केलेल्या सरावाचे चीज झाले अशी भावना गणसिंग पाटील व प्रवीण वारके या धावपटूंनी यावेळी बोलून दाखवली.



