भुसावळ – येथील श्री अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या तर्फे दिनांक 26 सोमवार रोजी सकाळी साडेआठ ते दुपारी अडीच पर्यंत रामनाम उत्सवाचे भव्य शिबिर नवशक्ती आवार येथे
आयोजित करण्यात आले . या शिबिराचा 150 पेक्षा जास्त सभासदांनी सहभागी होऊन आनंद घेतला.
रामनाम जप, विश्वप्रार्थना व ब्रम्हचैतन्य परमपूज्य गोंदवलेकर महाराजांचे प्रवचन वाचन होऊन शिबिरास सुरुवात झाली. सचिव रागिणी पुराणिक यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. नंतर रामरक्षा, रामस्तुती, हनुमान चालीसा व मारुती स्तोत्र या स्तोत्रांचे सामुदायिक पठण झाले. यानंतर छोटी विश्रांती घेऊन सर्वांना नाश्ता जी. आर. ठाकूर यांनी दिला तर मँगो ड्रिंक सुनिता जाधव यांनी दिले. त्यानंतर रामनाम जपाच्या माळा घेऊन प्रत्येकाने दीड तास मौन जप केला. शंभर पेक्षा जास्त सभासदांनी जप केला. यावेळी आवारात अतिशय शांतता होती ( पिन ड्रॉप सायलेन्स) . एकूण दोन लाख साठ हजार इतका जप झाला. हा जप गोंदवल्यास कळविण्यात येईल.
त्यानंतर प्राचार्य डॉक्टर सुचिक सर यांनी नामाचे महत्त्व यावर प्रवचन केले. अत्यंत प्रभावी, ओघवती, समुद्राच्या लाटांप्रमाणे अखंड रोमांचित करणारे विचार एक तास मांडले. रामाचे प्रत्यक्ष दर्शन होत नाही, त्याची कृपा दिसत नाही पण ती कृपा असतेच त्यामुळे आपण जीवनात क्रोध, भाव, कुभाव, आवेश यातून मार्ग काढू शकतो. केवळ राम नामा ने दशदिशात कल्याण होईल. रामनामात गर्क झाल्यावर सर्व विकार नष्ट होतात, मनाची एकाग्रता वाढते.
रामनाम जप किती, केव्हा करावा तर तो गुरुच्या आज्ञेप्रमाणे करावा. आपण पूजा पाठ, मंदिरात जाणे, नाती सांभाळणे करतो. हे सर्व कर्मकांड नसून हे सर्व नियमबद्ध जीवनासाठी आवश्यक आहे.
तुलसीरामचरितमानस याचे डॉक्टर सूचीक सर हे विद्वान व गाढे अभ्यासक असल्यामुळे त्यांचे विचार प्रत्यक्ष ऐकण्यातच विशेष आनंद वाटला
प्राचार्य डॉक्टर सूचिक सर, रो. अध्यक्ष नूतन फालक, रो. हिरामण फालक, रो. श्रीमान राधेश्याम लाहोटी, रो. श्री. राजीव शर्मा, रश्मी शर्मा यांचा सत्कार पुष्पगुच्छ व शाल देऊन संघाचे अध्यक्ष रघुनाथ आप्पा सोनवणे यानी केला.
रामाची आरती अध्यक्ष रघुनाथ आप्पा सोनवणे व त्यांच्या पत्नी मालती ताई यांनी केली. नंतर महाप्रसादाच्या जेवणाची उत्तम व्यवस्था रो. अध्यक्ष नूतन फालक व रो. राजीवजी शर्मा यांनी केली होती.
उत्सव यशस्वी होण्यासाठी संघाचे बहुसंख्य सभासद तसेच दिनकर बेंडाळे, शकुंतला भंगाळे, लता बेंडाळे, गोपाळ तिवारी, सुनंदा औंधकर, जयश्रीताई ढाके, शशीप्रभा माजी शर्मा कुटुंब व रो. जी. आर. ठाकूर यांनी परिश्रम घेतले .



