भुसावळ – कोरोना काळातून बाहेर पडत असतानाच सुरू झालेली जागतिक मंदीची चर्चा आणि एकूणच अर्थव्यवस्थेची चाल या मुळे भारतीय तंत्र-उद्योग क्षेत्रावर अनेक परिणाम संभवतात आणि ह्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम एकूणच उद्योगांमधील रोजगाराच्या संधीनवर होत असतो. अश्या काळात अभियांत्रिकीचा कोणता अभ्यासक्रम निवडावा जेणेकरून भविष्यात करिअरच्या उत्तम संधी मिळतील. या संदर्भातील निर्णय घेताना उपयोगी पडतील अशा काही महत्त्वाच्या विषयांवर श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात “आभियांत्रिकीची वाट निवडतांना” ह्या विषयावर चर्चासत्र घेण्यात आले. ह्या दरम्यान आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. राहुल बारजिभे यांनी अभियांत्रिकी शाखेची निवड करत असतांना एककल्ली विचार न करता आपल्या देश आणि वैश्विक ह्या दोघही स्तरांवर होणारे बदल लक्षात घेत अभियांत्रिकीची वाट निवडली पाहिजे असे सांगितले. आय. टि. क्षेत्र म्हणाल किंवा संगणक तंत्रज्ञान व सॉफ्टवेअर निर्मिती ह्या बाबतीत काही दशकांपूर्वी आपण थोडेसे पिछाडीवर होतो, त्यामुळे शासकीय पातळीवर म्हणा किंवा खाजगी पातळीवर म्हणा आय. टि. , संगणक तंत्रज्ञान व सॉफ्टवेअर ह्या क्षेत्रात भारताचे प्रभुत्व निर्माण करण्यासाठी अत्यंत धोरणात्मक प्रयत्न झाले आणि त्याच्या परिणामातून ह्या क्षेत्राने प्रचंड वेग पकडला. आणि कोरोना काळात वर्क फ्रॉम होम ह्या संकल्पनेमुळे ही क्षेत्र अधिकम ठळकपणे पुढे आले. आणि कम्प्युटर किंवा आय टि ह्या सध्याच्या घडीला outperform करणारे सर्वोत्तम क्षेत्र समजले जात असले तरी अभ्यासक्रम निवड आणि रोजगार ह्या विषयी विचार करता अत्यंत संतुलित विचार होणे अत्यंत आवश्यक आहे. जगातील सगळीच काम संगणक किंवा प्रोग्रम्मिंग च्या माध्यमातून शक्य नाहीये आणि फक्त वर्क फ्रॉम होम ह्या संकल्पनेतुन तर त्याहून शक्य नाहीये ही इथे समजून घ्यावे लागेल. इलेक्ट्रॉनिक्स उपकरण, विद्युत यंत्र आणि विद्युत निर्मिती, यंत्र-वाहने,घरे आणि रस्ते ह्या त्याहून अधिक मूलभूत गरजा ठरणार आहे आणि इथे भारताला मोठा पल्ला गाठायचा आहे. कोणतेही सरकार संतुलित विकासासाठी प्रयत्नरत असते त्यामुळे येणाऱ्या काळात इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि सिविल क्षेत्रात तोंडिसतोड रोजगार संधी उपलंबड होतील ही नक्की. त्यामुळे सगळ्यांनी फक्त आय. टि. क्षेत्राचा ध्यास न घेता संतुलित विचार करत शाखा निवड करावी कारण ह्या मूलभूत शाखांमध्ये तोंडिसतोड रोजगार संधी उपलब्ध होतील. त्याहून महत्वाचे म्हणजे ह्या मूलभूत शाखा कोणत्याही औद्योगिक आणि तंत्र बदलांना किंवा उतार चढावांना पुरून उरतात असे डॉ. राहुल बारजिभे यांनी सांगितले.
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्यूनिकेशन विभागप्रमुख डॉ. गिरीश कुलकर्णी व मेकॅनिकल इंजीनीअरिंग विभागप्रमुख प्रा. ए. व्ही. पाटील यांनी चर्चासत्रात भाग घेतांना भारताच्या बाबतीत बोलायचे झाले तर प्रचंड मोठी लोकसंख्या आणि भूभाग असलेला आपला भारत देश अनेक आघाड्यांवर पुढे जातोय. भारतीय इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन क्षेत्रात होत असलेले धोरणात्मक बदल आणि येऊ घातलेले फाइव-जी तंत्रज्ञान तसेच इलेक्ट्रॉनिक्स विषयीचे नवीन राष्ट्रीय धोरण यांमुळे अनेक संधी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्यूनिकेशन क्षेत्रात उपलब्ध होतील. दिवसेंदिवस मानवाचा इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट्स वापरण्याकडे वाढणारा कल आणि त्या गॅझेट्सच्याच माध्यमातून संवाद, मनोरंजन व्यापार आणि विपणन ते शिक्षण अश्या मानवी जीवनाच्या प्रत्येक अंगाला इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्यूनिकेशन क्षेत्र आज व्यापून आहे. केंद्र सरकारने सुद्धा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्यूनिकेशन क्षेत्रातिल भारताचे परावलंबीत्व संपवण्याचा चंग बांधला असून इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची निर्मिती आणि टेलीकम्यूनिकेशन तंत्रज्ञानाच्या विस्तारीकरणाचे धोरण अवलंबले आहे. इलेक्ट्रॉनिक्स बरोबरीनेच पेट्रोल आणि डीजल ह्या इंधनांवरील वाहन उद्योगाचे अवलंबीतव कमी करण्यासाठी वाहननिर्मिती क्षेत्रात मोठे बदल होत आहेत. हे बदल तसेच बॅटरी ऑपरेटेड इलेक्ट्रिक वाहने , रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग ह्या क्षेत्रातील वाढती क्रयशक्ती , थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञानात होणारे बदल आणि वाहन उद्योग क्षेत्राची वाढणारी उत्पादन आणि वितरण क्षमता ह्या मुळे मागच्या काही वर्षात काहीसे संथ झालेल्या मेकॅनिकल इंजीनीअरिंग ह्या पायाभूत शाखेनेही आता कात टाकायला सुरुवात केली असून खाजगी आणि शासकीय पातळीवरील गतिमान घडामोडी पाहता नजीकच्या काळात इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्यूनिकेशन आणि मेकॅनिकल इंजीनीअरिंग ह्या शाखांमध्ये खाजगी आणि शासकीय ठिकाणी हजारो रोजगार निर्माण होतील असे निरीक्षण अनेक तज्ञांनी नोंदवल्याचे नमूद केले.
भारताचे वीज निर्मिती, वीज वहन व वीज पुरवठा ह्या बाबतीत सुसूत्रता आण्यासाठी सुद्धा युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे विद्युत अभियांत्रिकी ही पायाभूत शाखा वीज निर्मिती, वीज वहन व वीज पुरवठा तसेच यंत्र निर्मिती, दळणवळणाची साधने , उपकरणे, कम्युनिकेशन्सची साधने, तसेच सरकारी, सार्वजनिक, खाजगी वीज क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध करून देईल असे वाटते. तसेच विद्युत यंत्र व उपकरणे निर्मिती, देखभाल, सेवा, सल्ला इ. संदर्भातिल अनेक व्यावसायिक संधी सुद्धा इलेक्ट्रिकल इंजीनीअरिंग क्षेत्रात उपलब्ध होतील असे इलेक्ट्रिकल इंजीनीअरिंग प्रा. अजित चौधरी यांनी नमूद केले.
सिव्हील विभाग प्रमुख डॉ. पंकज भंगाळे यांनी प्रचंड मोठा भूभाग असलेल्या ह्या आपल्या देशात रेल्वे मार्ग असतील, महामार्ग असतील किंवा शहर आणि गावातील रस्ते असतील ह्यांच्या वेगवान बांधणीला सुरुवात झाली आहे. एयरपोर्ट, बंदरे ह्यांची निर्मिती घरनिर्मितीला चालना ह्यामुळे स्थापत्य अभियांत्रीकी पदवी स्वतःचा उद्योग किंवा विविध क्षेत्रात नौकरीच्या बऱ्याच संधी उपलब्ध करून देईल . राज्य शासनाच्या विविध विभागात जसे की पी.डब्ल्यु.डी, ईरिगेशन, एम.जे.पी, झेड. पी, महानगरपालिका, टाऊन प्लानिंग व केंद्र शासनच्या पोस्ट, रेल्वे, सी.डब्लू.सी., डिफेन्स, नी.री., सी.पी.ब्लू.डी इत्यादी, निम्न शासकीय विविध विभागात जसे की एन.टी.पी.सी., बि.एच.ई. एल., ओ.एन.जी.सी., ई.एस.आर.ओ., एच.पी.सी.एल., एस.ए.आय.एल., एम.आय.डी.सी. इत्यादी व खाजगी विविध क्षेत्रात जसे की रोड, ब्रिज, एव्हीगेशन, टॉवर, डॅम कन्स्ट्रक्शन इत्यादी क्षेत्रात नोकरीच्या बऱ्याच संधी आज ही उपलब्ध आहेत असे प्रतिपादन केले.
हिन्दी सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ. रविकांत परदेशी, सचिव श्रीमती. एम.डी.शर्मा, कार्याध्यक्ष सत्यनारायण गोडयाले, कोशाध्यक्ष एम.डी.तिवारी, रमेश नागराणी, संजय नाहटा, बिसेन अग्रवाल,पंकज संड यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.



