भुसावळ – वेद म्हणजे ज्ञानाचा महासागर आहे तर अनेक शोधांची जननी आहे. यामुळे हिंदू संस्कृतीत चार वेदांना महत्व असून वेदांची शास्त्रीय माहिती आत्मसात करायला हवी, असे प्रतिपादन ब्राह्मण संघाचे चिटणीस तथा शिक्षकनेते प्र. ह. दलाल यांनी केले. गुढीपाडव्यानिमित्त ब्राह्मण संघात वेदपूजन झाले, यावेळी ते बोलत होते.

ब्राह्मण संघात अनेक वर्षांच्या प्रथा परंपरेनुसार शनिवारी गुढीपाडव्या निमित्ताने चार वेदांच विधिवत मंत्रोच्चारच्या जयघोषात पूजन संपन्न झाले. या मंगलमय प्रसंगी ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद या चारही वेदांचे सर्व उपस्थितांनी विधिवत पूजन केले. प्रारंभी ब्राह्मण संघाचे चिटणीस प्र. ह. दलाल यांनी वेद म्हणजे काय, ते स्पष्ट करून आपल्या भारतीय संस्कृती व वैदिक धर्माचा मूलाधार म्हणजे वेद. प्रत्येक वेदात नेमके काय आहे तेही थोडक्यात सांगितले. संघाचे अध्यक्ष विजय जोशी यांनी सपत्नीक यजमान पद स्वीकारून पूजा केली. पौरोहित्य संघाचे उपाध्यक्ष व वेद, अध्यात्मचे गाढे अभ्यासक सुनिल पाठक यांनी केले. त्यांनी प्रत्येक वेदांचा शास्त्रीय पद्धतीने पूजा सांगितली. सुमारे दीड तास मंत्रोच्चारात परिसर दणाणून गेला होता. या मंगलमय वातावरणाने सर्वत्र चैतन्य निर्माण झाले होते. कार्यकारिणी सदस्य शंतनु गचके, पंकज जोशी संजय बोचरे, संजय भोकरडोळे, प्रसन्ना गंधे, रवी फडके, सुधीर देशपांडे, सरिता कुलकर्णी, गीता नागराज आदींची यावेळी उपस्थिती होती. वेदांची पालखी विविध फुलांनी सुंदर सजविली होती. अनेक नागरिकांनी दर्शनाचा लाभ घेतला.



