भुसावळ – जवळपास मागील तीन महिन्यापासून सर्वसामान्यांची लालपरी म्हणून ओळख असलेली एस.टी. बस सेवेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला असल्याने गावागावात एस.टी. बस येत नसल्याने विद्यार्थ्यांना शाळा, कॉलेजमध्ये वेळेवर जाण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. यासह अनेक बाबी शैक्षिक आगाजचे राज्य समन्वयक, पर्यावरण जागर मंच महाराष्ट्रचे कार्याध्यक्ष नाना पाटील यांनी केलेल्या सर्वेक्षणातून समोर आल्या आहेत.
त्यात विद्यार्थाचे शैक्षणिक नुकसान, खाजगी वाहनाने आर्थिक मोठा फटका, खाजगी वाहनामुळे वेळ खूप वाया जातो. कारण प्रवासी पूर्ण भरल्यावर खाजगी वाहने निघतात. खाजगी वाहनात ओव्हरलोड प्रवासी, जीव धोक्यात घालून प्रवास, वेळेवर शाळा-महाविद्यालयात जाता येत नाही. त्यामुळे शैक्षणिक नुकसान होते. रोज खाजगी वाहनासाठी आर्थिक खर्च वाढल्याने पैसा कुठून आणावा? यामुळे शाळेत जाता येत नाही. शासनाने नियमित ग्रामीण भागातील बस सुरू कराव्यात. कारण ९, १०वी, १२वी परिक्षा प्रात्यक्षिक परिक्षाची सुरुवात झाली.
मागील वर्षांपासून कोरोणाची लागण झाल्यापासून शाळा, महाविद्यालय सोबतच एस.टी. बस प्रवासी सेवाही बंद होती. परंतु आता कोरोना या आजाराचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. म्हणून दैनंदिन व्यवहार हळूहळू सुरळीत होत आहेत. सोबतच शाळा, महाविद्यालय व सर्व शैक्षणिक संस्था सुरु करण्यात आल्या असून विद्यार्थी वर्ग गेल्या वर्षापासूनची मरगळ झटकून मोठ्या उत्साहात शाळेत जाऊन अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी मेहनत करत आहेत. परंतु खेडेगावात उच्च शिक्षणाची व्यवस्था नसल्याने ग्रामीण भागातील शंभर टक्के मुलामुलींना शिक्षणासाठी बाहेर गावी जावे लागत आहे. आधीच कोरोना काळात शाळा, महाविद्यालये बंद होते. यात विद्यार्थ्यांचे बरेच शैक्षणिक नुकसान झाले आहे. सोबतच आता लग्नसराईच्या हंगामात व इतर दैनंदिन कामासाठी खेडेगावातील लोकांना मजबुरीने खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या मदतीने जीव धोक्यात टाकून दामदुप्पट प्रवासभाडे देऊन आपली दैनंदिन कामे पूर्ण करावी लागत आहे.
विद्यार्थ्यांना सर्वात जास्त फटका – एस.टी.सेवा बंद असल्याचा सगळ्यात जास्त फटका विद्यार्थ्यांना बसत असून विशेष करून विद्यार्थी-विद्यार्थीनींना खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनातून प्रवास करणे त्रासदायक व जीवघेणे ठरत आहे. तसेच मागील काळात शाळा, महाविदयालय बंद असल्याने ऑनलाईन अभ्यासक्रम घेतांना बऱ्याचशा अडचणी आल्याने व्यवस्थित अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकला नाही. उपउपमुख्यमंत्री यांनीही आवाहन केले आहे की, शनिवार-रविवारी जादा तास घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करावा. तसेच 10वी, 12वीच्या मार्च व एप्रिल महिन्यात परिक्षा घेण्यात येणार असल्याचे जाहीर झाले आहे. म्हणून विद्यार्थीवर्ग अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करण्यासाठी धडपडत असतांनाच एस.टी. बसेस बंद असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी वर्ग शाळा, कॉलेजमध्ये वेळेवर जाता येत नसल्याने त्यांच्या अभ्यासिकाच्या तासिका बुडत आहेत. यात मानमोडी, शिंदी, गोजोरा, वराडसीम, सुनसगाव, चोरवड, साकेगाव, खडका, किन्ही,वांजोळा, पाडळसा, वाघळूद, अंजाळे, कुऱ्हा पानाचे या मोठ्या लोकसंख्येच्या गावांसह इतर लहानमोठ्या गावातील विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणात असून यांना जीवावर खेळून खाजगी वाहनातून जास्तीचे भाडे देऊन जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. म्हणून गावखेड्यातील विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयामध्ये वेळेवर जाण्यासाठी व परत घरी येण्यासाठी शाळेच्या वेळेनुसार बस नियमित सुरु कराव्यात, असे आवाहन हजारो विद्यार्थी व शिक्षक, पालकवर्गाकडून करण्यात येत आहे.



