नशिराबाद ग्रामपंचायतीत अपहार प्रकरणी माजी सरपंचाला अटक :


नशिराबाद : ग्रामपंचायतीत तत्कालीन सरपंचाने शासनाच्या स्वच्छ भारत अभियानातर्ंगत वैयक्तिक शौचालयांसाठी मिळणारे अनुदानात अपहार केल्याप्रकरणी नशिराबाद पोलिसात गुन्हा होता. तेव्हापासून तत्कालीन सरपंच हा गेल्या पाच वर्षापासून पसार होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या संशयीत आरोपीला कल्याण येथून मोठ्या शिताफीने अटक केली. खिलचंद दगडू रोटे (41, नशिराबाद) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.


नशिराबादचे तत्कालीन सरपंच खिलचंद दगडू रोटे हा सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी त्यांनी दोन शासकीय कर्मचार्‍यांच्या मदतीने शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकामात 12 लाख 84 हजारांचा अपहार केला होता. या प्रकरणी तत्कालीन वरीष्ठ सहाय्यक लेखा शेख रईस शेख मुनाफ व नशिराबाद ग्रामविकास अधिकारी दिलीप रामा शिरतुरे यांना सेवेतून निलंबीत करण्यात आले होते. तर तत्कालीन सरपंच खिलचंद रोटे हा तेव्हा पासून पसार होता. दरम्यान जिल्हा परीषदेकडून रोटे यांना नोटीस बजावून अपहारातील 50 टक्के रकमेचा भरणा करण्याबाबत नोटीस बजावली होती. मात्र त्यांनी भरणा न केल्याने त्यांच्याविरुद्ध ग्रमाविस्तार अधिकारी यांच्या फिर्यादीवरुन रोटे यांनी 6 लाख 42 हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून रोटे हा पसार होता.


संशयीत खिलचंद रोटे हा कल्याण पश्‍चिम येथील एका कंपनीत नोकरीस असून तो साई चौक परीसरात राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांचे पथक तीन दिवसांपासून मुंबई, कल्याण, व ठाणे या ठिकाणी ठाण मांडून होते. रोटे हा साईचौकात येताच पोलिसांनी सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळल्या. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकातील जितेंद्र पाटील, अकरम शेख, नितीन बाविस्कर, संदीप सावळे यांच्या पथकाने केली.