वीज मीटर रिडींग एजन्सीची मान्यता रद्द करावी – शिवसेना –


भुसावळ – शहरातील मामाजी टॉकीज परिसर, जुना सातारा, खळवाडी, अयोध्या नगर, काशीराम नगर, श्री नगर, गणेश कॉलनी परिसरातील दगडू उत्तम रोकडे, सुनील अर्जुन पाटील, जयश्री प्रकाश कोलते, हेमंत वसंत जोशी, नलिनी अरुण तळेले, नितीन कमलाकर खरे, एकनाथ लक्ष्मण सुरवाडे, युवराज रतन ठाकूर या वीज ग्राहकांच्या वीज देयकाच्या समस्या सोडवण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे तालुका संघटक प्रा. धीरज पाटील, शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे, माजी नगरसेवक दीपक धांडे, ग्राहक संरक्षण कक्ष तालुकाप्रमुख देवेंद्र पाटील, उपशहर संघटक संदीप ठाकूर ग्राहकांनी कार्यकारी अभियंता प्रदीप घोरुडे यांची भेट घेतली. शहरात अनेक ग्राहकांना चुकीचे वीज देयक देण्यात आले आहेत हि समस्या मागील एक वर्षांपासून सुरु असल्याने वीज मीटर रिडींग एजन्सीची मान्यता रद्द करावी अशी मागणी करण्यात आली.

दोन वर्षांपूर्वी जिनस कंपनीने नवीन मीटर बसविले परंतु साधारण ४० टक्के मीटर अपडेट केले नाहीत तर रिडींग एजन्सी मनमानी कारभाराने फेक रिडींग ग्राहकांच्या देयकात समाविष्ट करीत आहे. २० टक्के ग्राहकांना अजूनही दुसऱ्याच ग्राहकांच्या वापराची देयके देत आहेत. रिडींग एजन्सीच्या भोंगळ कारभाराची तक्रार अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता यांच्याकडे लेखी स्वरूपात केली होती. रिडींग एजन्सीमुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतो तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांचे काम वाढते असे प्रा. धीरज पाटील यांनी सांगितले.

कोरोनाच्या लॉकडाउनमध्ये महावितरणने मीटरचे रिडिंग घेतलेच नाही. महावितरणच्या आवाहनानुसार ग्राहकांनी ऍपवर ऑनलाईन रिडिंग अपलोड केले परंतु त्यांनाही चुकीची देयके आलेली आहेत. विशेष बाब म्हणजे एकही ग्राहकाला घरपोच बिले मिळालेली नसून महावितरण कार्यालयात बिलासाठी फेऱ्या माराव्या लागत आहे. कोरोना नंतरसुद्धा रिडींग घेतले जात नाहीय. अनेक घरामध्ये फक्त जेष्ठ नागरीक राहतात त्यांच्याकडे अँड्राईवड फोन किंवा साधा फोन सुद्धा नाही असे ग्राहक स्वतःच्या वीज वापराचे रिडींग कसे पाठवणार? असा सवाल शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे यांनी केला.

जळगाव रोड परिसरातील ग्राहकांना चुकीची देयके आली असल्यास शिवसेना विभागीय कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन माजी नगरसेवक दीपक धांडे, ग्राहक संरक्षण कक्ष तालुकाप्रमुख देवेंद्र पाटील यांनी केले आहे.

मागील दोन वर्षांपासून तक्रार केल्यावरही चुकीचे बिल देण्यात येत आहे, अधिकारी लक्ष देत नाही. ग्राहक मंचात तक्रार करणार आहे- राहुल दगडू रोकडे…. ९८२३३७३१३८