भुसावळ – मुंबईहुन भुसावळला आलेल्या दोघा व्यापाऱ्यांना भंगार दाखविण्याच्या बहाण्याने जंगलात नेऊन त्यांची सुमारे पावणेचार लाख रूपयात लुट करण्याची घटना नुकतीच येथे १४ ऑगस्ट रोजी सकाळी अकराच्या सुमारास घडली घडली असून या प्रकरणी येथील बाजारपेठ पोलिस ठाण्यात आज
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, भाईंदर येथील व्यापारी संदीप प्रभुलाल वाणीगोटा हे भंगार खरेदीचा व्यवसाय करतात. त्यांना भुसावळ येथील काही जणांनी भंगार विक्रीसाठी संपर्क केला. यानुसार संदीप प्रभुलाल वाणीगोटा व त्यांचे साडू दिनेशकुमार चंपालाल जैन हे दोघे रेल्वेने मुंबई येथून भुसावळला १४ ऑगस्ट रोजी सकाळी आले. भुसावळ स्थानकाबाहेर त्यांना घेण्यास आलेल्या वाहनातून संदीप वाणीगोटा व जैन या दोघांना मुक्ताइनगरला नेण्यात आले. तेथे जवळच कुऱ्हा काकोडा येथे कारखाना असून तेथील तांब्याचा माल पाहायचा आहे, असे सांगत दोघांना कुन्हा काकोडाच्या जंगलात नेण्यात आले. यानंतर त्यांना कारमधून उतरवण्यात आले. यावेळी दुचाकींवर आलेल्या सुमारे १५ जणांनी वाणीगोटा व जैन यांना मारहाण करीत त्यांच्याजवळील सोन्याचे दागिने, घड्याळ, मोबाइल व रोख २५ हजार रुपये हिसकावून घेतले. एवढेच नव्हे तर दोघांना मलकापूर येथे घेवून गेले व तीन एटीएम कार्ड हिसकावून घेत एटीएम मधून रक्कम काढली. यामध्ये युनियन बँकेच्या एटीएममधून २४ हजार ६३०, आयडीबीआयच्या एटीएममधून १० हजार ५३० आणि महावीर एंजरप्रायजेस या खात्यातून आयडीबीआयच्या एटीएममधून १ लाख रुपये बळजबरीने काढून घेत एकूण पावणेचार लाख रूपयांची लुट केली. यानंतर दोघांना मलकापूर रेल्वे स्थानकाजवळ उतरवून देत चोरट्यांनी पोबारा केला.
दरम्यान वाणीगोटा व जैन यांनी रेल्वेने मुंबई गाठून मुंबई पोलिसांना माहिती दिली. मात्र, त्यांनी भुसावळात गुन्हा दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार वाणीगोटा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिस ठाण्यात संशयीत आरोपी बलवीर, विक्रम, शरीफ यांचेसह १० ते १५ जणांविरूद्ध जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अनिल मोरे व सहकारी पुढील तपास करत आहेत.



