शके 1219 मध्ये वैशाख वद्य दशमीच्या दिवशी महतनगर येथील तापीतीरावर श्रीसंत आदीशक्ती मुक्ताई गुप्त झाल्या. या घटनेला शुक्रवार, दि. 4 जून 2021 रोजी 724 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त संत मुक्ताई गुप्त होण्याच्या प्रसंगाचा घेतलेला वेध –

नामा म्हणे पूजा तापीतीरा ॥
साक्षात श्रीमहादेव, श्रीविष्णू, श्रीब्रह्मा व श्रीआदीशक्ती यांनी अनुक्रमे संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव आणि संत आदीशक्ती मुक्ताई यांच्या रूपाने अवतार घेतल्याचे संत जनाबाईंनी म्हटले आहे. संत ज्ञानेश्वरादी भावंडांनी जगाचा उध्दार करण्यासाठी अवतार घेतला. आपले अवतार कार्य संपल्यानंतर संत ज्ञानेश्वरांनी शके 1218 मध्ये 21 वर्ष 3 महिने 5 दिवसांचे असतांना आळंदी येथे समाधी घेतली. संत सोपानदेवांनी शके 1218 मध्ये 19 वर्ष 1 महिना 13 दिवसांचे असतांना सासवड येथे समाधी घेतली. संत निवृत्तीनाथांनी शके 1219 मध्ये 23 वर्ष 4 महिने 11 दिवसांचे असतांना त्र्यंबकेश्वर येथे समाधी घेतली. संत आदीशक्ती मुक्ताई यांनी समाधी घेतली नसून त्या तापीतीरी गुप्त झाल्या आहेत. त्याला संत नामदेव महाराज यांच्या अभंगांचा पुरावा आहे.विठ्ठलपंतांनी संन्यास घेतल्यानंतर गुरूंच्या आदेशाने रूक्मिणीशी विवाह करून गृहस्थाश्रमात प्रवेश केला. त्यानंतर त्यांना चार अपत्ये झाली. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव यांच्यानंतर संत मुक्ताई यांचा जन्म प्रमाथी नाम संवत्सर शके 1201 मध्ये आश्विन शुद्ध प्रतिपदा नवरात्रीच्या प्रारंभीला शुक्रवार या दिवशी झाला. जन्मापासून चारही भावडांचा संन्यासाची मुले म्हणून छळ होवू लागला. छळाला कंटाळून ते कुटुंबासहीत त्र्यंबकेश्वराला गेले. तेथे निवृत्तीनाथांना एका गुहेत गहिनीनाथांचा अनुग्रह प्राप्त झाला. त्यांनी ते ज्ञान ज्ञानेश्वर व त्यानंतर सोपानदेव व संत मुक्ताई यांना दिले. मातापिता निघून गेल्यानंतर ही भावंडे पोरकी झाली. काही दिवस आपेगावी राहून त्यानंतर आळंदीला येवून राहू लागली. परंतु तिथेही त्यांना जननिंदा सहन करावी लागत होती. त्यानंतर चारही भावंडांच्या जीवनात एकामागोमाग घडलेल्या घटनांमुळे त्यांचे महत्व लोकांचे समजू लागले. लोकांच्या रागातून झोपडीचे दार बंद करून बसलेल्या आपल्या ज्ञानेश्वरदादांचा राग कमी करण्यासाठी संत मुक्ताई यांनी 11 अभंगांची रचना केली. तेच ताटीचे अभंग होत. त्यानंतर संत ज्ञानेश्वरांनी जगत्मान्य असा ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. चौदाशे वर्षांचे ऋषी चांगदेव यांचे गर्वहरण आणि विठ्ठलभक्त संत नामदेव यांचे अहंकार विसर्जन करण्याचे काम लहानग्या मुक्ताईने केले. संत मुक्ताईंनी हरिपाठ, ताटीचे अभंग, कल्याणपत्रिका, पदे, झोपाळ्यावरील ओव्या, हळदुली, पाळणे, सासुरवास, स्फुट अभंग यासह अनेक विषयांवर लेखन केलेले आहे. आपल्या छोट्याशा आयुष्यकाळात चारही भावडांनी जगतविख्यात काम केले. आपले अवतारकार्य संपल्यावर श्री संत ज्ञानेश्वरांनी आळंदी, सोपानदेवांनी सासवड तर चांगदेवांनी पुणतांबे येथे समाधी घेतली. चांगदेवांचा समाधी सोहळा आटोपल्यानंतर संत निवृत्तीनाथ, संत नामदेव यांच्यासह सर्व संत मंडळी नेवासे येथे आली. त्यानंतर सर्वांनी म्हाळसादेवी, टोकेश्वर, पैठण, आपेगाव, वेरूळ आदी तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेतले. जेव्हा संत मुक्ताई यांच्या गमनाचा प्रसंग आला तेव्हा स्वतः पांडुरंगांनी चौथी मुक्ताई नेमियेली तापी असे गुप्तपणे सांगितले. उदास होवून हे शरीर रक्षू नये यासाठी मुक्ताईंनी अन्नपाण्याचा त्याग केला. त्यावेळी निवृत्तीनाथांच्या मनात तळमळ सुरू होती. त्यांना कळले की, संत मुक्ताई गमनाची वेळ जवळ येत आहे. त्यामुळे मुक्ताईला सांभाळण्याचे त्यांनी इतरांना सांगितले. इतकेच नाही तर स्वतः प्रत्यक्ष आपल्या लहानग्या बहिणीचा हात धरून तिला सांभाळत चालू लागले. हा सर्व संतांचा मेळा पांडुरंगासह तापीतीरावर जावू लागला. त्यावेळी संत नामदेवांनी पांडुरंगाला तातडीने कोठे जात आहात? कोणते स्थळ नेमियेले आहे? असे विचारले. त्यावर पांडुरंगांनी, तापीचिये तिरी महतग्राम थोर | असे सोमेश्वर पुरातन ॥ तेथे परशुरामे मारियेला बाण | पहाती पुरातन पश्चिमेस ॥ असे सांगितले. त्यानुसार सर्व संतमंडळी तापीतीरावर आली. धन्य तापीतीर दिसे मनोहर | दोही थडीभार पताकांचे ॥ संत नामदेवांना तर हे स्थळ फारच पसंत पडले. म्हणून ते म्हणतात, नामा म्हणे हरी आवडीचे स्थळ | कण्हेर कमळ उदय झाला ॥ शिवाय वसंत ऋतु असल्यामुळे तेथील आम्रवृक्ष, मैलागिरी, चंदन, पारिजातक, सोनचाफे, जांभळी, रामफळी, सिताफळी, करंज, केळी, कर्दळी, कमळ, कण्हेर वगैरे झाडे फलपुष्पभाराने व लतावेलींनी गजबजून गेली होती. त्या लतावृक्षामध्ये मोर टाहो देत होते. कोकिळा सुस्वर गायन करीत होत्या आणि श्वेत, पीत, रक्तवर्णांच्या अशा निरनिराळ्या भ्रमरांचे गुंजारव वैष्णवांना ऐकावयास येत होते. त्यामुळे तेथील शोभा अत्यंत मनोहर दिसत होती. खान्देशातील चैत्र-वैशाखाचा कडक उन्हाळा व गगनचुंबी वृक्षांची घनदाट छाया अत्यंत आल्हाददायक वाटत होती. ऋषी, तपस्वी व योगीजन यांचे ठिकठिकाणी आश्रम असल्यामुळे तेथील रमणीयता विशेष खुलून दिसत होती. म्हणून प्रत्येकाच्या मुखातून मधुरध्वनी निघू लागले, धन्य महतनगर धन्य सोमेश्वर | धन्य तापीतीर योगियांचे ॥ या पुण्यभुमीत मार्कंडेय, श्रृंगऋषी आदींनी तपश्चर्या केली आहे. तसेच योगीश्रेष्ठ चांगदेवराय व त्यांच्या समकालीन असलेल्या योगीजनांच्या योगाभ्यासाला अत्यंत अनुकूल असे निवांतरम्य स्थळ होते. म्हणून नामदेवराय म्हणतात, नामा म्हणे देवा भला हा एकांत | मार्कंडेय येथ तप केले ॥ याप्रमाणे सृष्टीसौंदर्याची शोभा पाहता पाहता व कीर्तनभजनाचा आनंद अनुभवत असतांना एक आठवडा केव्हा निघून गेला हे कळलेही नाही. संत मुक्ताईंच्या जाण्याची वेळ जवळ येत होता. सर्व सुरवरांचा समुदाय तापीतीरी जमू लागला. गंधर्व सुस्वर गाणी गाऊ लागले. देवादिक एकामेकांमध्ये संत मुक्ताई यांच्या गमनाविषयी नेत्रसंकेत करू लागले. जसाजसा संत मुक्ताईंच्या जाण्याचा प्रसंग जवळ येत होता तसतशी सर्वांनाच चिंता वाटत होती. विधीच्या संकेतानुसार वैशाख वद्य दशमीच्या दिवशी सर्व संतमंडळी स्नानासाठी तापीतीरावर आली. यावेळी जिकडे तिकडे वीणामृदंगाचे झणत्कार होवू लागले. भगवंत नामाच्या गजराने व जयजयकाराने परिसर दणाणू लागला. स्नान आटोपून तापीतीरावरच सर्व संतमंडळी भजन करू लागली. वैशाख वद्यचा शेवटचा आठवडा असल्यामुळे एकाएकी वीजांचा कडकडाट सुरू होवून चारही दिशा कंपायमान होवू लागल्या. आता आकाश कोसळून पडते कि काय अशी भिती वाटू लागली. भयंकर वारा सुटून पृथ्वी थरथर कापू लागली. आकाश काळ्याकुट्ट मेघांनी भरून आले. सगळ्यांचे डोळे घट्ट झाकल्यासारखे झाले. कोणीच कोणाला दिसत नव्हते. यावेळी संत निवृत्तीनाथ, पांडुरंग, रूक्मिणी हे सर्व मुक्ताईला सांभाळा, मुक्ताईला सांभाळा असे म्हणू लागले. कोणालाच कोणाची शुध्द राहिलेली नव्हती. अशा परिस्थितीत, कडाडली वीज निरंजनी जेव्हा | मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली ॥ आकाशात विजांचा प्रचंड कडकडाट झाला. त्यावेळी निरंजनस्वरूप आदीशक्ती मुक्ताई एकाएकी अदृश्य झाल्या. सगळीकडे वातावरण शांत झाले. विजेचा कडकडाट शांत झाला. आकाशातील अभ्रे नाहीशी झाली. मात्र त्यानंतरही सर्वत्र त्रिभुवनात एक प्रहरपर्यंत प्रकाश होता. शके 1219 मध्ये वैशाख वद्य दशमीच्या दिवशी महत्नगर येथील तापीतीरावर 17 वर्ष 7 महिने 24 दिवसांच्या असतांना संत मुक्ताई गुप्त झाल्या. मुक्ताबाई मुक्त केली केशीराजे | नामा म्हणे पूजा तापीतीरा ॥ तापीतीराच्या संदर्भात विचार केला तर तापीनदीच्या उगमापासून म्हणजेच मध्यप्रदेशातील बैतूल जिल्ह्यापासून ते सूरतपर्यंत नदीच्या दोन्ही बाजूला तापीतीर म्हटले जाते. महाराष्ट्रापुरता विचार केला तर मुक्ताईनगर तालुक्यातील तर गुजरातच्या सीमेपर्यंत म्हणजेच प्रकाशा शहादापर्यंत तापीतीर म्हणता येते. त्यामुळे नेमके तापीतीर कुठले? तर त्यावेळी स्वत: पांडुरंग सांगतात, त्याचे वर्णन नामदेव महाराज अभंगरूपाने करतात, तापीचिये तिरी महत्ग्राम थोर | असे सोमेश्वर पुरातन ॥ तेथे पुरातन काळापासून भगवान भोलेनाथ सोमेश्वर नांदत आहेत. या ठिकाणाचा नेमका निर्देश करण्यासाठी नामदेवांनी पुढे म्हटले आहे की, तेथे परशुरामे मारियेला बाण | पहाती पुरातन पश्चिमेस ॥ संत नामदेवांचे हे म्हणणे दिशादर्शक आहे. यातून नामदेव महाराज यांना दिशा दाखवायची आहे. याआधीच्या अभंगांमध्ये तापीतीर, महत्ग्राम, सोमेश्वर असा उल्लेख आहे. मात्र हे स्थान नेमके कोठे? यासंदर्भात नामदेव महाराज दिशानिर्देश करून सांगतात की, ज्याठिकाणी परशुरामाने बाण मारलेला आहे त्याठिकाणाच्या पश्चिमेस संत मुक्ताई गुप्त होण्याचे स्थान आहे. हे तीनही पुरावे स्वत: पांडुरंगाने सांगितले असून संत नामदेवांनी त्याचे वर्णन अभंगरूपाने केलेले आहे. त्याचप्रमाणे मुक्ताई वीजेत गुप्त झाली नसून वीजेचा संबंध फक्त कालदर्शक आहे. जेव्हा वीज कडाडली तेव्हा मुक्ताई गुप्त झाली असा त्याचा अर्थ आहे. तसेच वीज पडल्याचा संत नामदेवांच्या अभंगात कोठेही उल्लेख नाही. याचवेळी दुसरीकडे कोठे वीज पडली असेल तर सांगता येणार नाही. कारण अशा परिस्थितीत अनेक ठिकाणी वीज पडू शकते. परंतु संत नामदेव महाराज यांच्या अभंगानुसार वीज पडल्याचा काहीएक संबंध नसून फक्त ज्यावेळी वीज कडाडली त्यावेळी मुक्ताई गुप्त झाली असा कालदर्शक निर्देश आलेला आहे. महाकल्पावरी चिरंजीव शरीर | किर्ती चराचर त्रिभुवनी ॥ श्री संत मुक्ताई महाकल्पापर्यंत याच शरीरानिशी आजही आहेत. हा अधिकाराचा विषय असून अधिकारसंपन्न साधकाला आजही याची प्रचिती येते. हे अनुभवगम्य ज्ञान आहे, एक गुपीत आहे, एक दर्शन आहे तापीतीरावर असणार्या एका जागृत देवस्थानाचे तथा शिवशक्तीपीठाचे. संत मुक्ताईंचे हे पवित्र तिरोभूत स्थळ सुमारे 650 वर्षे अज्ञात होते. परंतु संत नामदेव महाराज यांनी रचलेल्या आदी, समाधी व तिर्थावळी यातील तिरोभूत प्रसंगांच्या अभंगांचा आधार घेवून हे पवित्र तिर्थक्षेत्र शोधून काढण्यात आले. याच तिर्थक्षेत्रावर म्हणजे जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात असणार्या श्रीक्षेत्र मेहूण येथे येत्या शुक्रवार, दि. 4 मे 2021 रोजी श्री संत आदीशक्ती मुक्ताई यांचा 724 वा तिरोभूत म्हणजे गुप्तदिन सोहळा संपन्न होत आहे. संत आदीशक्ती मुक्ताईंना कोटी कोटी अभिवादन…! – डॉ. जगदीश पाटील, 8149498020


