संत एकनाथांची मानवतावादी अभंगवाणी ;

आज शुक्रवार, दि. २ एप्रिल २०२१ रोजी एकनाथ षष्ठी आहे. त्यानिमित्त प्रासंगिक लेख.

  • संत एकनाथ महाराजांच्या अभंगांमध्ये विठ्ठलभक्ती, सूक्ष्म व चौफेर समाजनिरीक्षण, समाजातील दलित वर्गाविषयी वाटणारी मोठी अनुकंपा, त्यांच्या उध्दाराची तिव्र तळमळ, भाषा व भावनांची विविधता यासह अनेक बाबी आढळतात. भागवतधर्माचे पूर्ण स्पष्टीकरण जाणून घ्यायचे असेल तर त्यांच्या अभंगवाणीचे निरीक्षण केले पाहिजे. त्यांचे ओवीबध्द ग्रंथ व त्यांचे अभंग एकमेकांना पूरक असून त्यांच्या ग्रंथातील सिध्दांतांना त्यांचे अभंग दृढ करणारे आहेत. पदे, भारूडे, रूपके व चरित्रे यांचा अंतर्भाव त्यांच्या अभंगातच आहे. एडका मदन, सगुण चरित्रे परम पवित्रे, मन रामी रंगले अशी उत्कृष्ट पदे नाथांनी लिहीलेली आहेत. त्यामुळे त्यांची अभंगवाणी भक्तीसह समाजप्रबोधन करणारी मानवतावादी अभंगवाणी असल्याची प्रचिती येते.
    संत एकनाथ महाराजांच्या अभंगात विठ्ठलभक्ती ठासून भरलेली दिसून येते. ज्यांच्या कृपेमुळे नाथांना हा साक्षात्कार झाला त्या विठ्ठलाचे, विठ्ठलाच्या खर्‍या प्रकाशमय स्वरूपाचे दर्शन आणि विठ्ठलाच्या नामाचेही महत्व नाथांनी सांगितलेले आहे. कृपाळू पंढरीनाथ हा नाथांच्या वडिलांचे दैवत असल्याने विठ्ठलनामाचे महानत्व ते सांगतात. विठ्ठलाचे परब्रह्मस्वरूप लक्षात घेऊन त्याची भक्ती केली पाहिजे. कारण त्याचे स्वरूप मंदीरातील एका भागात राहणारे संकुचित नाही, असे ते सांगतात.
    तत्कालिन समाजाच्या नैतिक अध:पतनाचे भयानक चित्र त्यांनी अभंगातून रेखाटलेले आहे. भक्तीवैराग्य बुडविणार्‍या लोकांमध्ये भक्ती, वैराग्य जागृत करण्याचे काम नाथांनी अभंगवाणीच्या माध्यमातून केले. त्यांनी तत्कालिन लोकांची आपल्या अभंगांमधून चांगलीच कानउघाडणी केलेली आहे. भूतखेते, शेंदूर फासून तयार केलेल्या प्रतिमा, पशुबळी देऊन त्यांची केली जाणारी पूजा, वरि वर्णांकडून यज्ञात होणारी पशुहत्या या गोष्टींपासून लोकांना नाथांनी सावध केले आणि सर्वव्यापक परब्रह्ममूर्ती विठ्ठलाच्या भक्तीचा प्रसार करून मोठी धार्मिक सुधारणा केली. ज्या सामाजिक दोषांमुळे, विषमतेमुळे, दंभामुळे समाज असंघटीत आणि दुबळा बनून दुसर्‍यांच्या गुलामीचे लाजिरवाणे जीवन जगतो आहे त्या दोषांवर, त्या ढोंगावर नाथांनी कडक टीका केली. सामाजिक दोषांमुळे पारतंत्र्य येते, हे त्यांनी सांगितले. यासाठी खर्‍या माणुसकीच्या धर्माची म्हणजेच मानवतावादाची प्रतिष्ठापना करावी. श्रे ध्येयाकरीता त्याग करून, जिवावर उदार होऊन लढण्याची प्रवृत्ती निर्माण करावी. त्याशिवाय पारतंत्र्य नष्ट होणे शक्य नसते. त्याचप्रमाणे पोटाकरिता धर्माचे सोंग करणार्‍या ढोंगी लोकांचा आणि कर्तव्यभ्रष्ट ब्राह्मणांचा त्यांनी निषेध केला. हे करत असतांना त्यांनी भक्तीचा प्रचार व प्रसारही केला. हरी, हर, विठ्ठल ही एकाच परब्रह्म परमात्म्याची भिन्न नावे आहेत, असा अद्वैत सिध्दांत त्यांनी सांगितला. देव वेगळा व भक्त वेगळा असे मानणारे काही लोक भक्ती-संप्रदायात भेद मानतात. परंतु मनुष्यातच नव्हे तर देव व भक्तीतही परिपूर्ण एकता हे भक्तीयोगाचे ध्येय असल्याचे त्यांच्या अभंगांतून दिसते. अद्वैत तत्वज्ञान व अभेदभक्ती त्यांच्या भागवत ग्रंथात व अभंगात दिसून येते. त्यावर ज्ञानेश्‍वरीची छाप आहे. त्यामुळे ज्ञानेश्‍वरांच्या साक्षात्काराविषयी ते सांगतात,
    श्री ज्ञानदेवे येऊनी स्वप्नांत | सांगितली मात मजलागी | |
    ज्ञानराजांची योग्यता व त्यांच्याविषयीचे प्रेम, भक्ती व जिव्हाळा नाथांनी आपल्या अभंगातून प्रकट केला आहे. त्याचप्रमाणे काही रूपकात्मक भारूडेही रचली आहेत. त्यांची रूपकात्मक भारूडे म्हणून प्रसिध्द असलेली अभंगरचना तात्विक, सामाजिक, राजकीय व वाङ्मयीनदृष्ट्या अभ्यसनीय आहे. त्यांच्या जोहार, महार या अभंगांतून त्यांचे निरहंकारित्व, सामाजिक सूक्ष्म निरीक्षण, दलितांविषयी अपार सहानुभूती व स्वत: त्यांच्यापैकी एक होऊन त्यांच्या योग्यतेचे आणि व्यथांचे दर्शन होते. तत्त्वज्ञ महार आणि अतत्त्वज्ञ ब्राह्मण यांचे उत्कृष्ट स्वभावचित्रण त्यांनी केले आहे. स्वत:ला महार म्हणवून समाजाला ते सारासार विचार करायला लावतात आणि त्यातून सावध होण्याचेही मार्गदर्शन करतात. हरीभजन, नामस्मरण, नवविधाभक्ती, तुळशीवृंदावन, अतिथीपूजन, संतांना शरण, तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, एकादशी व्रत आणि जागरण ही वैष्णवभक्तीचे लक्षणे अंगी आणण्याचे सोडून लोक अधर्म करतात. ब्राह्मण स्नानसंध्या, वेदपठन करीत नाहीत. उलट जारणमारण, मोहनादी गोष्टी करतात. यासाठी त्यांनी भक्ती व शक्तीचा पुरस्कार केला. अध्यात्मपर अभंग आणि भक्ती व शांतीचा पुरस्कार करणार्‍या अभंगात वेगळेपणे उठून दिसणारे व शक्तीदेवतेला आवाहन करणारे असे महालक्ष्मीफ हे वीररसपूर्ण लघुकाव्य आहे. महालक्ष्मीचे आवाहन बया दार उघडफ व दार लावफ असे केले आहे. ही महालक्ष्मी आदिमाया भगवती मूळ प्रकृती असून दाही अवतार अंबा, भवानी, दुर्गा, महिषासूरमर्दिनी ही सर्व आदिमायेचीच रूपे आहेत. एवढेच नव्हे तर विठ्ठलाचे रूपही आदिमायेचेच रूप आहे. त्या परब्रह्म परमात्म्याला नाथांनी महालक्ष्मी म्हटले आहे.
    नाथांनी आपल्या अभंगात निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपानदेव, मुक्ताई, नामदेव, गोरा कुंभार, सावता माळी, चोखामेळा या वारकरी सांप्रदायिक संतांची चरित्रे गायिली. रूक्मांगद कथा, तुलसीमहात्म्य, कृष्णदान, हनुमानजन्म, प्रल्हाद चरित्र, ध्रृवचरित्र, उपमन्युकथा, सुदामचरित्र, संदीपनकथा, रूक्मिणी स्वयंवरातील हळदुली इत्यांदी आख्यानांचीही त्यांनी रचना केलेली आहे. भारूडांप्रमाणेच त्यांच्या पदे, अभंग आणि गौळणी यांची संख्याही खुप मोठी आहे. त्यातही रूपके व कूट रहस्यही आहेत. गौळणींचा उपयोग धर्मज्ञान व लोकरंजन या हेतूने केला आहे. अभंगांच्याद्वारे लोकांना उपदेश करून लोकस्वभावही नाथांनी दिग्दर्शित केला आहे.
    अशा प्रकारे नाथांच्या अभंगवाणीत भक्तीयोग, नवविधाभक्ती, कर्मयोग, भागवतधर्म, सामाजिकता, अद्वैत तत्वज्ञान, निर्गुण-सगुणाचा साक्षात्कार, संतांची शरणागती, भागवतधर्माचा प्रसार व प्रचार, ब्राह्मण-महार संवाद, ढोंगी लोकांचे वर्णन, हिंदू समाजाची अवनत अवस्था, महालक्ष्मीचे आवाहन, सामाजिक विषमता, दलितांविषयी वाटणारी तळमळ, त्यांचे दु:ख पाहून होणार्‍या व्यथा, भागवत धर्माचे संपूर्ण विवेचन, त्यांची गुरूभक्ती, संतसंगतीचे महत्व, समाजातील अनिष्ट चालीरिती व प्रथांवर कडक प्रहार, समाजाच्या उध्दाराची कळकळ, भक्तीमार्गाचे मार्गदर्शन यासह मानवतावाद आणि विविध प्रकारचे विषय आढळून येतात. याच विषयांना अनुसरून त्यांनी अभंगरचना केली. देहाने व मनाने समाधानकारक अध्यात्मिक जीवन जगून त्यांनी शके १५२१ मध्ये फाल्गुन वद्य षष्ठीस आपला देह पैठण येथे ठेवून जलसमाधी घेतली.
  • डॉ.जगदीश पाटील, ८१४९४९८०२०
  • (संत एकनाथ अभंगगाथा : भक्ती विचार यावर पीएच. डी. केली आहे.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *