भुसावळ (प्रतिनिधी )-

मराठी भाषा संवर्धनासाठी जळगाव जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था तथा डायटतर्फे विद्यार्थ्यांसाठी अभिव्यक्ती व अभिवाचन स्पर्धा 2021 आयोजित करण्यात आली आहे. आपल्यातील उत्कृष्ट सादरीकरणाचे कौशल्य सिद्ध करण्याकरिता जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी घरबसल्या ऑनलाईन व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे जळगाव जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे यांनी सांगितले.
सर्व विद्यार्थ्यांसाठी असलेल्या अभिव्यक्ती स्पर्धेत प्रथम गट पूर्व प्राथमिक ते दुसरी असून वेळ 2 मिनीटे आणि विषय माझा आवडता खेळ आहे. द्वितीय गट तिसरी ते पाचवी असून वेळ 3 मिनीटे आणि विषय माझा आवडता मित्र /मैत्रिण /नातलग आहे. तृतीय गट सहावी ते आठवी असून वेळ 3 मिनीटे आणि विषय मला….. व्हायचे आहे, कारण…. हा आहे. चतुर्थ गट नववी ते बारावी असून वेळ 4 मिनीटे आणि विषय मला असं शिकायला आवडतं! हा आहे. अमराठी माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित अभिवाचन स्पर्धेत प्रथम गट तिसरी ते पाचवी असून वेळ 3 मिनीटे आणि विषय गद्य / पद्य मराठी अभिवाचन असा आहे. द्वितीय गट सहावी ते आठवी असून वेळ 3 मिनीटे आणि विषय गद्य / पद्य मराठी अभिवाचन असा आहे.
अभिव्यक्ती / अभिवाचनाचा व्हिडिओ 9403718020 या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्राचार्य डॉ. अनिल झोपे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा समन्वयक म्हणून बालभारतीचे मराठी भाषा अभ्यास मंडळ सदस्य डॉ. जगदीश पाटील असून अधिक माहितीसाठी भटू पाटील (8459945231) आणि सैय्यद अल्ताफ अली (8788042087) यांच्याशी संपर्क साधावा.
अभिव्यक्ती स्पर्धा ही सर्व माध्यमांच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी असून कोणत्याही भाषेत सादरीकरण करता येईल. अभिवाचन स्पर्धा ही अमराठी माध्यमांच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी असून फक्त मराठी भाषेतच सादरीकरण करता येईल. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. अभिव्यक्ती / अभिवाचनाचा व्हिडिओ दि. 14 फेब्रुवारी 2021 पूर्वी 9403718020 व्हाट्सअप क्रमांकावर पाठवावे. व्हिडिओ दिलेल्या गट, वेळ व विषय यानुसार असावा. आपल्या व्हिडिओमध्ये सुरूवातीला आपले संपूर्ण नाव, इयत्ता व शाळेचे नाव सांगून स्पर्धेचे सादरीकरण करावे. व्हिडिओ शूटिंग करतांना कमीत कमी MB चा होईल याची काळजी घ्यावी. जेणेकरून व्हिडिओ पाठवताना अडचण येणार नाही. व्हिडिओ परीक्षणाचे काम सुजाण परीक्षक करणार आहेत. त्यांनी घेतलेला निर्णय अंतिम राहील. दि. 27 फेब्रुवारी 2021 रोजी मराठी भाषा गौरवदिनी बक्षीस समारंभ ऑनलाईन आयोजित करण्यात येणार आहे. प्रत्येक गटातील पहिल्या तीन विजेत्यांना बक्षीसासाठी कळविण्यात येईल आणि उर्वरित सहभागींना सहभाग प्रमाणपत्र ऑनलाईन देण्यात येईल. अभिव्यक्ती स्पर्धा परीक्षणासाठी स्पष्ट उच्चार, विचारातील स्पष्टता व मांडणी, स्वतःची भाषाशैली, आत्मविश्वास, सादरीकरण कौशल्य असे निकष राहतील. अभिवाचन स्पर्धा परीक्षणासाठी पाठ्यउताऱ्याची निवड, स्पष्ट उच्चार, आवाजातील चढउतार व गती, आशयानुकूल हावभाव, सादरीकरण कौशल्य असे निकष राहतील. गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षकांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन जळगाव जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे यांनी केले आहे.



