भुसावळ (प्रतिनिधी )-
वीज वितरण कंपनी आपल्या कारभारामुळे नेहमीच चर्चेच असतं. त्याचा नमुना भुसावळात नव्याने अनुभवता आला. भुसावळ तालुक्यातील किन्ही, साकेगाव, शिरपूर कन्हाळे गावातील शेतकऱ्यांना अतिरिक्त व चुकीचे वीज बिल देण्यात आले आहे. ३ अश्व शक्तीचा पंप वापरला दर तीन महिन्याला १९५० युनिटचे देयक देण्यात येत आहे. सर्वात मोठी बाब म्हणजे त्यांना मागील दीड वर्षांपासून त्याच युनिटचे बिल देण्यात येत आहे. वेगवेगळ्या क्षेत्राच्या शेतीला समान वीज बिल देण्याची शक्कल लढवली आहे. साधारण गावात अनेक लोकांना १९५० युनिटचे बिल देण्यात आले असावे असा अंदाज आहे म्हणून ग्रामीण विभागाचे अभियंते डी. पी.धांडे यांच्या निदर्शनास शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धिरज पाटील, अविनाश पाटील, सागर वाघोदे, योगेश कोलते यांनी आणून दिले आहे.
शेतकऱ्याला सरासरी बिल दिले जाते. त्याच्या विजेचा वापर किती हे न पाहता अंदाजे बिल दिले जाते. त्यातही तीन व पाच अश्वशक्तीच्या पंपाला समान सरासरी बिल दिले जाते. महावितरणने जे बिल दिले आहे ते शेतकऱ्यांना निमूटपणे मान्य करावे लागते. बारमाही वीज वापरणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण दहा टक्केही नाही. वीज वापर उत्पन्नावर आधारित असतो मात्र महावितरण सरसकट शेतकऱ्यांना समान पद्धतीने कृषीपंपाचे बिल देते व सामान्य शेतकऱ्यांना भुर्दंड बसतो. याबाबतीतची तक्रार महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे केली आहे असे प्रा.धिरज पाटील यांनी कळविले आहे.
वारंवार तक्रार करूनसुद्धा महावितरणने लक्ष दिले नाही आता मोठ्या आकारनीचे देयक भरावे लागणार आहे. आलेल्या बिला एवढे वार्षिक उत्पन्न सुद्धा शेतात मिळत नाही अशी प्रतिक्रिया शेतकरी अशोक पाटील यांनी दिली आहे



