भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता संपूर्ण भारतात लॉकडाऊन सुरु आहे यामुळे यंदा लग्न सोहळ्याची धामधुम व थाटमाट यासह व-हाडी मंडळी यांच्या आनंदावर कोरोनामुळे विरजणच पडले आहे .मात्र अश्या स्थितीतही येथील पंचशिल नगरातील दिपक मगरे यांचेकडे ३० एप्रिल गुरुवार रोजी केवळ पाच लोकांमध्ये अत्यंत साध्या पद्धतीने विवाह संपन्न झाला .
पंचशिल नगरातील दिपक मगरे यांची मुलगी नेहा व साकरी येथिल रामू मेघे यांचा मुलगा सचीन यांचा साखरपूडा तीन महिन्यापूर्वी झाला होता व त्या वेळेस नेहा व सचिन यांचा विवाह ३० एप्रिल रोजी ठरला होता. परंतू भुसावळ शहरातील कोरोना ग्रस्तांची परिस्थिती पाहता त्यांच्या परिवारातील सदस्यांनी मुहर्तावरच लग्न लावण्याचे ठरवले व त्यानुसार वधू वर यांनी तोंडाला मास्क बांधून , सोशल डिस्टन्ससह शासनाचे नियमांचे पालन करून पंचशील नगर मधील विजय मोरे यांच्या घरी लग्न सोहळा गाजावाजा न करता फक्त पाच लोकांमध्ये पार पडला . यावेळी ए टी सुरळकर , युवराज नरवाडे, यांनी बोध्द पध्दतीने लग्न विधी पार पाडले.



