आषाढ महिन्यातील पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. भारतीय संस्कृतीत गुरुंना अनन्यसाधारण महत्त्व असून, गुरु हे जीवनाला योग्य दिशा देणारे, संस्कार देणारे आणि व्यक्तिमत्त्वाला आकार देणारे आदर्श मानले जातात. मात्र, निसर्ग हाच आपला सर्वांत मोठा गुरु असून, प्रत्येकाने गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुदक्षिणा म्हणून वृक्षारोपणासह त्या वृक्षाच्या संगोपनाचा संकल्प करावा, असे आवाहन पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे संचालक डॉ. सुरेंद्रसिंग पाटील यांनी केले आहे. मानव हा निसर्गाने निर्माण केलेल्या धरतीमातेचा पुत्र असून, निसर्गाशी आपले अतूट नाते आहे. आई-वडील हे आपले पहिले गुरु, बालवयात संस्कार देणारे शिक्षक हे मार्गदर्शक, तर आपल्या कुटुंबातील श्रद्धास्थाने, देवता आणि गुरु यांच्या आदर्शातून आपल्या जीवनाची जडणघडण होत असते. गुरुंच्या मार्गदर्शनामुळे व्यक्तीच्या आचरणात सकारात्मक बदल घडून चांगले विचार, चांगल्या भावना आणि माणुसकीची जाणीव विकसित होते. प्रत्येक गुरुने निसर्गाला गुरुचे स्थान, वृक्षांना दैवी रूप आणि धरतीला भूमातेचा दर्जा दिला आहे. आपण ज्या गुरुंना नमस्कार करतो, त्यांच्या ध्यानस्थ प्रतिमांमध्येही अनेकदा वृक्षाखाली धरतीवर बसून ध्यान करतानाचे चित्र दिसून येते. यावरून वृक्ष, निसर्ग आणि अध्यात्म यांचे परस्परांशी असलेले नाते अधोरेखित होते. झाडे ही केवळ निसर्गाची शोभा नसून ती प्राणवायूचा स्रोत, औषधींचा भंडार, जलस्रोतांचे रक्षक आणि जीवनाचे आधारस्तंभ आहेत. मात्र, सध्याच्या काळात विविध कारणांमुळे मोठ्या प्रमाणावर होणारी वृक्षतोड, वन व जंगल क्षेत्रात होत असलेली घट तसेच निसर्गनिर्मित साधनसंपत्तीचा ऱ्हास यामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होत आहेत. परिणामी, पूर, दुष्काळ, अतिवृष्टी, उष्णतेच्या लाटा आणि इतर नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढत असून, पृथ्वीवरील अनेक सजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या श्रद्धास्थानी असलेल्या गुरुंना गुरुदक्षिणा म्हणून त्यांच्या आवडीचे किंवा परिसरासाठी उपयुक्त असे वृक्षरोपण करावे. केवळ रोप लावून न थांबता, त्याच्या संगोपनाची व संरक्षणाची जबाबदारीही स्वीकारावी. आपल्या घराजवळ, शाळा, कार्यालय, सार्वजनिक परिसर किंवा उपलब्ध जागेत वृक्षारोपण करून त्याला नियमित पाणी देणे, संरक्षण करणे आणि तो वृक्ष वाढेपर्यंत त्याची काळजी घेणे हीच खरी गुरुदक्षिणा ठरेल. वृक्षारोपण व संगोपनाच्या माध्यमातून निसर्गाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न होईल. तसेच, ‘एक पेड माँ के लिये’ या अभियानातही प्रत्येकाचा सक्रिय सहभाग नोंदविता येईल. त्यामुळे यंदाच्या गुरुपौर्णिमेला गुरुंच्या चरणी केवळ श्रद्धा व्यक्त न करता, “एक वृक्ष लावूया आणि त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करूया,” असा संदेश डॉ. सुरेंद्रसिंग पाटील यांनी दिला आहे. — डॉ. सुरेंद्रसिंग पाटील संचालक, पर्यावरण जागर प्रतिष्ठान


