हतनूर धरणाचे २२ दरवाजे उघडले; तापी नदीपात्रात ४९,५८२ क्युसेक पाण्याचा विसर्ग : धरणातील एकूण जलसाठा ७४.४८ टक्क्यांवर; प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन ;

भुसावळ ( प्रतिनिधी )- 

सततच्या पावसामुळे हतनूर प्रमुख प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ होत असून, शनिवारी (दि. ४ जुलै) सकाळी १० वाजेपर्यंत धरणाची पाणीपातळी २१२.१८० मीटरपर्यंत पोहोचली आहे. धरणाची पूर्ण जलसाठा पातळी २१४.००० मीटर आहे.

सध्या हतनूर धरणातील एकूण जलसाठा २८९.०० दशलक्ष घनमीटर असून, तो धरणाच्या एकूण क्षमतेच्या ७४.४८ टक्के आहे. तर उपयुक्त जलसाठा १५६.०० दशलक्ष घनमीटर म्हणजेच ६१.१८ टक्के इतका नोंदविण्यात आला आहे.

धरणाचे २२ रेडियल दरवाजे प्रत्येकी १.०० मीटरने उघडण्यात आले असून, त्याद्वारे तापी नदीपात्रात १,४०४ घनमीटर प्रति सेकंद (४९,५८२ क्युसेक) पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तसेच, कालव्यातून ८.५० घनमीटर प्रति सेकंद (३०० क्युसेक) पाण्याचा विसर्ग सुरू असून, आर.एस. गेटद्वारे सध्या कोणताही विसर्ग करण्यात आलेला नाही.

दरम्यान, हतनूर प्रकल्प परिसरात आज २८ मिमी पावसाची नोंद झाली असून, चालू हंगामातील एकूण पर्जन्यमान ७६ मिमीपर्यंत पोहोचले आहे. धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत असल्याने प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले असून, नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

ठळक मुद्दे......

 धरणाची पाणीपातळी : २१२.१८० मीटर
 एकूण जलसाठा : २८९.०० दशलक्ष घनमीटर (७४.४८%)
 उपयुक्त जलसाठा : १५६.०० दशलक्ष घनमीटर (६१.१८%)
 उघडे दरवाजे : २२
 नदीपात्रातील विसर्ग : ४९,५८२ क्युसेक
 आजचा पाऊस : २८ मिमी
 हंगामातील एकूण पाऊस : ७६ मिमी