रेल्वेचे लोखंड चोरीच्या वादातून ५५ वर्षीय संतोष मंचाल यांची हत्या; तीन आरोपी जेरबंद, पोलिसांच्या 'ह्युमन इंटेलिजन्स'चा मोठा विजय भुसावळ (प्रतिनिधी) : रेल्वे लाईनलगतच्या दुर्गम भागात सापडलेला एक मृतदेह, घटनास्थळी कोणताही भौतिक पुरावा नाही, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही, मोबाईल लोकेशनचा कोणताही ठोस माग नाही आणि हत्येसाठी वापरलेले हत्यारही नाही. अशा संपूर्ण अंधारात चाचपडणाऱ्या भुसावळ शहर पोलिसांनी अवघ्या एका दिवसात अत्यंत नाट्यमयरीत्या हत्याकांडाचा छडा लावत तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या असल्याची माहिती पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलिस अधीक्षक संदिप गावित यांनी आज डीवायएसपी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. रेल्वेचे लोखंड चोरी करण्याच्या वादातून ५५ वर्षीय संतोष रघुवीर मंचाल यांच्या हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. दि. २८ जून २०२६ रोजी रात्री भुसावळ शहराजवळील रेल्वे लाईनशेजारील दुर्गम परिसरात संतोष रघुवीर मंचाल (वय ५५) यांचा मृतदेह आढळून आला होता. कोणाशीही विशेष वैर नसलेल्या या व्यक्तीची एवढ्या क्रूर पद्धतीने हत्या कोणी आणि का केली, हा मोठा प्रश्न पोलिसांसमोर उभा होता. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. १४५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपासासमोर मोठे आव्हान या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांसमोर अनेक अडचणी होत्या. या प्रकरणात एकही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता. घटनास्थळी कोणतेही भौतिक पुरावे मिळाले नव्हते. तसेच मोबाईल लोकेशनसह कोणतेही ठोस तांत्रिक पुरावे उपलब्ध नव्हते. त्यामुळे या गुन्ह्याचा छडा लावणे हे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरले होते. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन पोलीस अधीक्षकांनी स्वतः घटनास्थळी भेट दिली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) तसेच भुसावळ शहर व बाजारपेठ पोलीस ठाण्यांची पथके तपासासाठी सक्रिय झाली. स्थानिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांनी आपल्या गुप्त माहितीदारांचे जाळे सक्रिय करत तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोस्टमॉर्टम अहवालातून मिळाला पहिला धागा या संपूर्ण प्रकरणाला कलाटणी देणारा पहिला महत्त्वाचा धागा पोस्टमॉर्टम अहवालातून मिळाला. मृत संतोष मंचाल यांच्या जबड्यावर आणि बरगड्यांवर जबर मारहाण झाल्याचे निष्पन्न झाले. विशेष म्हणजे, या हत्येत कोणत्याही प्रकारचे हत्यार वापरण्यात आले नव्हते. त्यामुळे पोलिसांनी प्राथमिक अंदाज व्यक्त केला की, हल्लेखोर हा शारीरिकदृष्ट्या सक्षम, बॉडीबिल्डर, बॉक्सर किंवा खेळाडू असण्याची शक्यता आहे. मात्र, अशा प्रकारच्या व्यक्तीने एका ५५ वर्षीय व्यक्तीची हत्या का केली असावी, हा प्रश्न अनुत्तरितच होता. 'हळदी'च्या कार्यक्रमातील व्हिडीओ ठरला तपासाचा टर्निंग पॉइंट तपासादरम्यान डीबी स्टाफमधील एका कर्मचाऱ्याला माहिती मिळाली की, घटनेच्या रात्रीच एका हळदी समारंभात वाद झाला होता आणि त्या वादादरम्यान एका व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आल्याचा व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओमध्ये मारहाण करणारा संशयीत आरोपी हर्षल राजू वर्मा हा तरुण दिसत होता, जो परिसरात बॉक्सर म्हणून ओळखला जात होता. हर्षल वर्माची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि घटनेच्या रात्री त्याच्या संशयास्पद हालचाली लक्षात घेऊन पोलिसांनी त्याच्यावर लक्ष केंद्रित केले. गुप्त माहितीदारांकडून मिळालेल्या अचूक माहितीच्या आधारे पोलिसांनी हर्षल वर्मा आणि त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतले. कसून चौकशीत उलगडले हत्याकांडाचे गूढ सुरुवातीला पोलिसांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयितांची जेव्हा कौशल्यपूर्ण आणि सखोल चौकशी करण्यात आली, तेव्हा त्यांच्या कथांमधील विसंगती उघडकीस आल्या. अखेर पोलिसी चौकशीसमोर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणात संशयीत आरोपी हर्षल राजु वर्मा वय. १९ रा. नवरंग हॉटेलजवळ भुसावळ , क्षितीज संजय भालेराव वय १९ रा.झेड.टी.सी भुसावळ , प्रफुल्ल उत्तम जाधव वय. २१ रा.जुना सातारा भुसावळ यांचेकडुन भंगार विकत घेतल्याची कबुली दिली. यावरून हर्षल राजू वर्मा, क्षितिज संजय भालेराव आणि प्रफुल उत्तम जाधव या तिघांचा थेट सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून, पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. रेल्वेचे लोखंड चोरीच्या वादातून झाला खून आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या रात्री ते रेल्वेचे लोखंडी स्क्रॅप चोरी करण्यासाठी गेले होते. त्याचवेळी संतोष मंचाल तेथे आले आणि आरोपींशी त्यांचा वाद झाला. हा वाद काही क्षणांतच हाणामारीत बदलला. रागाच्या भरात आरोपींनी संतोष मंचाल यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत जबड्यावर आणि बरगड्यांवर गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. 'ह्युमन इंटेलिजन्स' आणि टीमवर्कचा पुन्हा विजय या संपूर्ण प्रकरणात कोणतेही प्रत्यक्ष पुरावे उपलब्ध नसताना केवळ मानवी गुप्त माहिती यंत्रणा, पोलिसांचा अनुभव, तपासातील बारकावे आणि विविध पथकांमधील समन्वयाच्या जोरावर अवघ्या २४ तासांत हत्याकांडाचा उलगडा करण्यात भुसावळ पोलिसांना यश आले आहे. आधुनिक तांत्रिक पुरावे नसतानाही पोलिसांच्या 'ह्युमन इंटेलिजन्स' आणि प्रभावी टीमवर्कने पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध केली आहे. सदरची उल्लेखनीय कारवाई पोलीस अधिक्षक जळगाव. श्रीकांत धिवरे . अपर पोलीस अधिक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी भुसावळ केदार बारबोले यांचे मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा जळगाव चे पोनि/श्री. राहुल गायकवाड पोनि/महेश गायकवाड, पोनि/राहुल वाघ तसेच स्था.गु.शा चे दुयम अधिकारी अंमलदार तसेच भुसावळ शहर पोस्टे व बाजारपेठ पोस्टे कडील गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अंमलदार यांनी केलेली आहे.



