पोखरी तांडा येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात रंगली भजन संध्या..! सूर, शब्द आणि भक्तीचा एक अप्रतिम त्रिवेणी संग…

      जळगाव/प्रतिनिधी :-  जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पोखरी तांडा येथे निसर्गाच्या कुशीत वसलेले श्री स्वामी समर्थ गुरुपद्म पादुका मंदिर म्हणजे भक्तांचे एक हक्काचे श्रद्धास्थान...!
   निर्जला एकादशीच्या पवित्र मुहूर्तावर या शांत आणि निसर्गरम्य देवस्थानात भक्तीचा एक अनोखा सोहळा अनुभवायला मिळाला.निसर्गरम्य आणि भक्तीमय परिसर,शांत वातावरण: आजूबाजूला हिरवेगार शेतशिवार आणि मधोमध वसलेले हे स्वामींचे आणि बारा हनुमानांचे मंदिर मनाला असीम शांतता देते. मंदिराच्या परिसरातील पवित्र आणि प्रसन्न वातावरणामुळे येथे येणारा प्रत्येक भाविक मंत्रमुग्ध होतो. निर्जला एकादशीचे औचित्य साधून जळगाव येथील प्रसिद्ध "भक्तीनाद" भजन संध्या ग्रुपच्यावतीने येथे सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत भजनाचा खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.सुश्राव्य भजनांमुळे संपूर्ण परिसर स्वामीनाम ,श्रीरामाच्या आणि मारोतीरायाच्या गजराने दुमदुमून गेला होता. उपस्थित भाविक-भक्त विठूराय आणि स्वामींच्या भक्तीत पूर्णपणे लीन झाले होते. गायक निलेश पाटील, कलावंत व निवेदक तुषार वाघुळदे आणि सहकारी प्रवीणआबा पाटील यांनी आपल्या  या भजन संध्येत विशेष रंग भरला. या जागृत आणि देखण्या देवस्थानचे मुख्य विश्वस्त वंदनीय रामदादा यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराची व्यवस्था आणि आजचे सर्व धार्मिक कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध व भक्तीमय वातावरणात पार पडले.त्यांनी या देवस्थानाबद्दल माहिती सांगितली व गुरुकुल,गोशाळा  तसेच भविष्यातील उपक्रम याबद्दल माहिती विशद केली. निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या या पावन भूमीत एकादशीच्या निमित्ताने सूर,शब्द आणि भक्तीचा एक अप्रतिम त्रिवेणी संगम पाहायला मिळाला. स्वामी भक्तांसाठी हा सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला.या कार्यक्रमास पोखरी तांडा,पिंप्राळा ,हुडको परिसरातील नागरिक उपस्थित होते.