भुसावळात रेल्वेच्या पूर्णा कॉलनीत लोडशेडिंगचा कहर;

रेल्वे कर्मचारी व कुटुंबीय उकाड्याने हैराण!
प्रशासकीय अनास्था: अधिकारी एसीत,तर कर्मचारी अंधारात;सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर
भुसावळ(प्रतिनिधी )- येथील रेल्वेच्या पूर्णा कॉलनीमध्ये सध्या वीज कपातीचा (लोडशेडिंग) प्रचंड कहर सुरू असून, यामुळे रेल्वे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय कमालीचे त्रस्त झाले आहेत. कडक उन्हाळा आणि त्यातच सातत्याने खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे लहान मुलांपासून ते वृद्ध आई-वडिलांपर्यंत सर्वांचेच हाल होत आहेत. त्यातच रेल्वेच्या विद्युत विभागाकडून कर्मचाऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याने रेल्वे कर्मचाऱ्यां मध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. 

लाईट गेल्याने रात्र जागून काढण्याची वेळ.
दिवसभर रेल्वेची खडतर ड्युटी करून कर्मचारी जेव्हा घरी परततात, तेव्हा पंखे बंद असल्याने त्यांना असह्य उकाड्याचा सामना करावा लागतो. वीज नेमकी केव्हा जाते आणि केव्हा येते, याचा काहीही नेम राहिलेला नाही. अनेकदा रात्रीच्या वेळी मेणबत्तीच्या प्रकाशात जेवण करावे लागते. उकाड्यामुळे लहान मुलांना घरात झोपणे कठीण झाल्याने, अनेक लहान मुले रात्रीच्या वेळी घराबाहेर आवारात झोपलेली दिसून येतात. काही वेळेस वीज पुरवठा सुरळीत होतो, तेव्हा तो इतक्या अति दाबाने (हाय व्होल्टेज) होतो की घरातील उपकरणे जळण्याची भीती निर्माण झाली आहे.

अंधाराचा फायदा घेत क्वार्टर्सवर दगडफेक
या सततच्या लोडशेडिंगमुळे आता सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गत मंगळवारी रात्री वीज गेलेली असताना, अंधाराचा फायदा घेऊन काही अज्ञात टवाळखोर मुलांनी पूर्णा कॉलनीतील रेल्वे क्वार्टर्सवर दगडफेक केल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही, मात्र यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबात भीतीचे वातावरण आहे. या संदर्भात रेल्वे अधिकारी आणि आरपीएफ (RPF) यांना कल्पना देऊनही कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही.

अधिकारी एसीत तर कर्मचारी उकाड्यात

रेल्वे अधिकारी स्वतः वातानुकूलित (एसी) केबिन आणि घरांमध्ये आराम करतात, तर रेल्वेचे चक्र चालवणारा सामान्य कर्मचारी मात्र बिना पंख्याचा उकाड्यात तळमळत राहतो, हे कितपत योग्य आहे? असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे. रेल्वे प्रशासनाने कर्मचाऱ्यांना दिलेली ही निवासस्थाने 'सुविधा' आहेत की 'असुविधा', अशीच चर्चा आता कॉलनीत सुरू आहे. वारंवार होणाऱ्या या लोडशेडिंगमुळे कर्मचाऱ्यांची झोप पूर्ण होत नाहीये. अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांनी रेल्वेची ड्युटी कार्यक्षमतेने कशी करावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. रेल्वे प्रशासनाने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देऊन वीज पुरवठा नियमीत सुरळीत करावा आणि कॉलनीतील सुरक्षा वाढवावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांमधून जोर धरत आहे.