जळगाव जिल्ह्यातून हजारो आंबेडकरवादी उपवर्गीकरण रद्द मोर्चासाठी मुंबईला जाणार— जिल्हास्तरीय बैठकीत मोठा निर्धार

भुसावळ(प्रतिनिधी ) – अनुसूचित जातीतील उपवर्गीकरण रद्द करण्याच्या मागणीसाठी ३० जून रोजी मुंबई मंत्रालयावर आयोजित लाखोच्या महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर आज  दि. २७ जून २०२६ भुसावळ येथील मैत्रेय बुद्ध विहार येथे जळगाव जिल्हा पूर्व भारतीय बौद्ध महासभेच्या महिला-पुरुष विभागासह समविचारी आंबेडकरवादी संघटना व राजकीय पक्षांची संयुक्त जिल्हास्तरीय बैठक पार पडली.

या बैठकीत ‘अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण रद्द करा आणि संवैधानिक सूचीत कोणताही बदल करू नका’ या मागणीसाठी जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते मोर्चाला जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष सुमंगल तथा रवींद्र अहिरे गुरुजी होते, तर मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्य सचिव डॉ. के. वाय. सुरवाडे गुरुजी व राज्यसंघटक लताताई तायडे उपस्थित होत्या.

भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव आंबेडकर, सरसेनानी आनंदराज आंबेडकर, आमदार राजकुमार बडोले व माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीला रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, एससी-एसटी रेल्वे असोसिएशनचे माजी अध्यक्ष शांताराम जाधव, रिपब्लिकन सेने चे जिल्हा विनोद सोनवणे,डेमोक्रॅटिक रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय साळवे, भुसावळ मंडळ अध्यक्ष वाल्मिकी देहाडे, प्रकाश सरदार, विश्वास कदम, गणेश जाधव, महिला विभागाच्या जिल्हाध्यक्ष प्रियंका ताई अहिरे, जिल्हा कोषाध्यक्ष प्रा. डॉ. संजीव साळवे, तसेच सर्व तालुका शाखांचे पदाधिकारी, समता सैनिक दलाचे अधिकारी, सैनिक आणि महिला विभागाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीची सुरुवात त्रिसरण-पंचशील स्वीकारण्याने झाली. त्यानंतर जळगाव पूर्व शाखेतून किती कार्यकर्ते मोर्चाला जातील, याचे नियोजन करण्यात आले. सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने मोर्चात सहभागी होण्याचा संकल्प केला. तसेच संघटनात्मक उपक्रम, वाहतूक, जनजागृती आदी विषयांवर सविस्तर चर्चा व संवाद साधण्यात आला.

बैठकीच्या औपचारिक कार्यक्रमात नुकतेच केंद्रीय शिक्षक-शिक्षिका पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांचा सत्कारही करण्यात आला. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन जिल्हा सरचिटणीस सुशीलकुमार हिवाळे यांनी केले.

या बैठकीतून जळगाव जिल्ह्यातील आंबेडकरवादी चळवळीला नवी उमेद मिळाली असून, ३० जूनचा मोर्चा ऐतिहासिक करण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला.