खानदेशचे लोकनेते एकनाथराव खडसे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त अनुभव, आठवणी व दुर्मिळ छायाचित्रांचे आवाहन

जळगाव : महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर प्रदीर्घ काळ लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत राहून आपल्या अभ्यासू नेतृत्वाने, संघर्षशील वृत्तीने आणि जनसामान्यांच्या प्रश्नांप्रती असलेल्या संवेदनशीलतेने राज्याच्या राजकारणात वेगळी छाप निर्माण करणारे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (नाथाभाऊ) हे दिनांक २ सप्टेंबर २०२६ रोजी वयाची ७४ वर्षे पूर्ण करून अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहेत.

या निमित्ताने त्यांच्या जनसेवेच्या प्रदीर्घ, प्रेरणादायी आणि लोकहितकारी प्रवासाचा गौरव करण्यासाठी २ सप्टेंबर २०२६ रोजी अमृत महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या अनुषंगाने अमृत महोत्सव समितीने नाथाभाऊ यांच्या सहवासातील, कार्यातील किंवा जनसंपर्कातील अनुभव, आठवणी व लेखी स्वरूपातील मनोगते पाठविण्याचे आवाहन केले आहे.

नाथाभाऊ यांनी आपल्या राजकीय आणि सामाजिक कार्यातून असंख्य कार्यकर्ते घडविले, अनेकांच्या वैयक्तिक तसेच सार्वजनिक समस्या सोडविल्या आणि हजारो कुटुंबांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले. त्यांच्या कार्याविषयीचे निवडक अनुभव "अनुभवाचे बोल" या स्मरणग्रंथात प्रकाशित करण्यात येणार आहेत.

तसेच, नाथाभाऊ यांच्या राजकीय व सामाजिक प्रवासातील दुर्मिळ छायाचित्रांचे संकलन करून विशेष स्मरणिका स्वरूपातील "फोटो बुक" प्रकाशित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिक, कार्यकर्ते, हितचिंतक आणि सहकारी यांनी आपल्या संग्रहातील दुर्मिळ छायाचित्रे समितीकडे पाठवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

लेख, अनुभव, आठवणी व छायाचित्रे ३० जून २०२६ पर्यंत ई-मेल : eknathkhadse1952@gmail.com या पत्त्यावर किंवा मोबाईल क्रमांक ९८२३२८८६८९ (प्रा. डॉ. सुनिल नेवे) व ९४२२२७८९७८ (योगेश कोलते) यांच्याकडे पाठवावे असे आवाहन  आयोजकांनी आहे.