स्वयंसेवी संस्थांनी प्रशासनास मदत करावी – गजानन राठोड यांचे आवाहन ; कोरोना निर्मूलन संदर्भात बैठकीत मार्गदर्शन;

भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरात वाढत असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावावर चर्चा व तोडगा काढण्या संदर्भात जय गणेश फाउंडेशन तर्फे शहरातील सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती . त्यावेळी विभागीय पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड बोलत होते.
शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत आहे, प्रशासन त्यांस प्रतिबंध घालण्यासाठी काम करतेच आहे, परंतु सामाजिक व स्वयंसेवी संस्थांनी सुद्धा त्यास हातभार लावला पाहिजे. सर्वसामान्य जनता ह्या काळातील आपल्या समस्या वभावना अधिकाऱ्यांपर्यंत थेट पोहचवू शकत नाही त्या विविध संस्थांच्या प्रतिनिधींमार्फत पोहचवणे आणि प्रशासनाच्या अडचणी समजून घेऊन लोकांपर्यंत पोहचवणे यासाठी सदर बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे तसेच कोरोना प्रादुर्भावावर प्रशासनास मदत करण्याचे आवाहन जय गणेश फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी सांगितले.यावेळी शहर व्यापारी मंडळाचे अध्यक्ष राधेश्याम लाहोटी, अखिल भारतीय जैन संघटनेचे प्रेमभाऊ कोटेचा, सराफ असोसिएशन चे अध्यक्ष नाना विसपुते, बांधकाम मटेरियल संघटना अध्यक्ष प्रिन्सि गुजराल, सामाजिक कार्यकर्ते सलीमभाई चुडीवाले, नाट्यकर्मी विरेंद्र पाटील, धर्मराज देवकर, अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक संघाचे जी.आर.ठाकूर, जय गणेश ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष विलास चौधरी,अंतर्नाद प्रतिष्ठान चे जीवन महाजन, रोटरी रॉयल्सचे राजेंद्र यावलकर यांनी चर्चासत्रात भाग घेऊन विविध समस्या व उपाय सांगितले.
कोरोना पासून वाचण्यासाठी जनतेने स्वार्थी व्हावे – गजानन राठोड
समस्या ऐकून घेतल्यानंतर विभागीय पोलीस उपअधीक्षक गजानन राठोड म्हणाले, कोरोना पासून वाचण्यासाठी जनतेने स्वार्थी व्हायला पाहिजे ,म्हणजेच स्वत: व परिवारातील सदस्यांना विनाकारण घराबाहेर निघू देऊ नका.पोलीस प्रशासन यापुढे कडक बंदोबस्त करणार आहे त्यामुळे कुणीही पोलिसांना कारवाई करण्यास भाग पाडू नका. कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने मर्यादा येतात, त्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी प्रशासनास मदत केली पाहिजे. त्यासाठी सर्व संस्थांच्या सदस्यांनी आपल्या परिसरातील दहा कुटुंब दत्तक घेऊन त्यांचे भेटी घेऊन सर्वेक्षण केले पाहिजे. काही लक्षणे असल्यास दवाखान्यात जाण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले. उशिरा दवाखान्यात पोहचत असल्याने आपल्या कडे मृत्यू दर जास्त असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच सर्वांच्या सूचना शासनाचा प्रतिनिधी म्हणून नगरपालिका प्रशासनापर्यंत पोहचविण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
बैठकीचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक रोटरीचे माजी अध्यक्ष अरुण मांडळकर यांनी केले, तर यशस्वीततेसाठी जय गणेश फाउंडेशनचे समन्वयक गणेश फेगडे, सचिव तुषार झांबरे, राहुल भावसेकर, हर्षल वानखेडे, खेमचंद्र भंगाळे आदी पदाधिकारी यांनी प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *