भुसावळ (प्रतिनिधी )- वरणगाव येथील भवानीनगर परिसरात चारचाकी वाहन उभे करण्याच्या किरकोळ कारणावरून वाद होऊन पती-पत्नीला मारहाण केल्याची घटना शनिवारी (ता. १८) रात्री सुमारे १०.३० वाजेच्या दरम्यान घडली. या प्रकरणी ८ ते ९ जणांविरुद्ध वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत दिलीप हरी चौधरी (वय ५२, रा. भवानीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, शनिवारी रात्री वीजपुरवठा खंडित असल्याने ते कुटुंबासह अंगणात बसले होते. त्यावेळी नाजिम नावाच्या युवकाने त्याचे चारचाकी वाहन त्यांच्या घरासमोर उभे केले. संबंधित ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा नळ असल्याने गाडी न लावण्याची विनंती चौधरी यांनी केली.
यावरून नाजिम संतापून शिवीगाळ करत चौधरी यांना चापटा-बुक्क्यांनी मारहाण करू लागला. त्यांची पत्नी सरला यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाही मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्यांच्या उजव्या डोळ्याजवळ सूज आली आहे.
त्यानंतर अज्जू बाबा (पूर्ण नाव माहिती नाही), लाला पठाण व त्यांच्या सोबत असलेल्या आणखी ५ ते ६ जणांनीही घटनास्थळी येत शिवीगाळ करत मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या गोंधळात सरला चौधरी यांच्या गळ्यातील सुमारे तीन तोळे सोन्याची माळ तुटून हरवली असून त्याचेही नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व संबंधितांना पोलीस ठाण्यात आणले. फिर्यादीवरून नाजिम गोगाशेठ, अज्जू बाबा, लाला पठाण व इतर ५ ते ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरणगाव पोलीस करीत आहेत.


