विचारवाहकच दूर गेल्याने दलित चळवळीची वाताहत -भुसावळातील व्याख्यानात डॉ. मिलिंद बागुल यांचे मत

भुसावळ (प्रतिनिधी) –
भारतीय समाजव्यवस्थेतील अनिष्ट रूढी-परंपरांना छेद देत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्ञानाच्या बळावर सामाजिक परिवर्तनाचा पाया रचला. बाबासाहेबांनंतरच्या पहिल्या पिढीने त्याग आणि समर्पणातून चळवळ जिवंत ठेवली, ज्याचा फायदा घेत आजच्या पिढीने आपली सांसारिक घडी बसवली आणि प्रगती साधली. मात्र, प्रगतीनंतर केवळ स्वतःचे अस्तित्व टिकवण्यात मशगूल झालेल्या विचारवाहकांनी चळवळीशी फारकत घेतल्यामुळे आज दलित चळवळीची वाताहत होताना दिसत आहे, असे परखड मत साहित्यिक डॉ. मिलिंद बागुल यांनी व्यक्त केले.
भुसावळ येथील शांतीनगर परिसरातील मैत्री संघटनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लाेणारी मंगलकार्यालयात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: विचारवाहकांची जबाबदारी’ हा त्यांच्या व्याख्यानाचा मुख्य विषय होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. नगरसेवक युवराज लोणारी, मैत्री संघटनेचे अध्यक्ष प्रेरणा नरवाडे, नगरसेविका सीमा नरवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. बागुल पुढे म्हणाले की, चळवळीच्या जोरावर समाजाने शिक्षण आणि प्रतिष्ठा मिळवली, परंतु हीच सुशिक्षित पिढी आज चळवळीची जबाबदारी घेण्यास पुढे येत नाही. ही उदासीनता समाजाच्या भविष्यासाठी घातक आहे. प्रास्ताविक डॉ. जे. व्ही. धनवीज यांनी केले, तर परिचय धम्मचारी आर्यसागर मनीष गुरचळ यांनी करून दिला. सूत्रसंचालन धम्मचारी आदित्यकीर्ती एन. एस. गुरचळ यांनी केले आणि आभार भीमराव सरदार यांनी मानले. मालती धनवीज, वैशाली उमरे व सोनाली जगदेव यांनी त्रिशरण पंचशील वंदना सादर केली. विवेक नरवाडे यांनी भीमगीतांचे गायन केले.