पालिका सभा तहकूब प्रकरणी भुसावळ भाजप गटनेते युवराज लोणारी आणि नगरसेवकांचा पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीवर आरोप

भुसावळ (प्रतिनिधी ) : सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पालिकेची सभा वारंवार तहकूब केली जात असल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्यामुळे अमृत योजनेची कामे ठप्प झाली असून, विविध विकासकामांवर परिणाम होत असल्याचे भाजप गटनेते युवराज लोणारी आणि नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

भाजपच्या म्हणण्यानुसार, ठेकेदारांकडून ३५ टक्के कमिशनची मागणी होत असल्यामुळे स्वच्छतेच्या ठेकेदाराने काम बंद केले आहे. परिणामी शहरातील दैनंदिन स्वच्छता, सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता आदी सेवा विस्कळीत झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून केले जाणारे आरोप हे “उलटा चोर कोतवाल को डाटे” या म्हणीप्रमाणे असल्याची टीका यावेळी करण्यात आली.

दरम्यान, विकासकामांमध्ये भाजप अडथळा आणत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीने सोमवारी आक्रोश मोर्चा काढला होता. यावर प्रत्युत्तर देताना भाजपने मंत्री संजय सावकारे यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली आणि सर्व आरोप फेटाळले.

१३ मार्च रोजी झालेली सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा गायत्री भंगाळे आणि स्वीकृत सदस्य संतोष चौधरी यांनी अरेरावी करत बेकायदेशीररीत्या तहकूब केल्याचा आरोप भाजपने केला. तसेच, सभागृहात पत्रकारांनाही प्रवेश नाकारण्यात आल्याचा दावा करण्यात आला. सभेत जाणीवपूर्वक गोंधळ घालून शांतता भंग करण्याचा प्रयत्न होत असल्याचेही भाजपने म्हटले.

यावेळी सभेतील व्हिडिओचित्रण दाखवत भाजपने प्रश्न उपस्थित केला की, सभेत नेमके अरेरावी कोण करत आहे आणि महिलांकडे आक्रमकपणे कोण धावून जाते? भाजप नगरसेवकांवर करण्यात आलेले सर्व आरोप खोटे असल्याचा दावा करण्यात आला.

वारंवार सभा तहकूब केल्यामुळे शहराचा विकास रखडत असल्याचा आरोप करत भाजपने सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.

पत्रकार परिषदेला गटनेते युवराज लोणारी, उपनगराध्यक्षा शैलजा नारखेडे, किरण कोलते, परीक्षित ब्रहाटे आदींसह मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते.