वृत्तपत्रांच्या अस्तित्वासाठी ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ आक्रमक; पालघर जिल्हा कार्यकारिणी आणि महिला विंग तर्फे वसई तहसीदारांना निवेदन

वसई (प्रतिनिधी ) – राज्यातील वृत्तपत्र उद्योग हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून कार्यरत असून जनतेपर्यंत शासनाच्या योजना आणि धोरणे पोहोचवण्याचे महत्त्वाचे कार्य करत आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत कागद, छपाई साहित्य, वीज आणि मनुष्यबळ यांसारख्या मूलभूत खर्चात सुमारे १५०% पर्यंत वाढ झाली आहे. या वाढत्या महागाईमुळे वृत्तपत्र व्यवसाय आर्थिक संकटात सापडला असून, अनेक लघु व मध्यम वृत्तपत्रांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर, ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ पालघर जिल्हा आणि महिला विंग कार्यकारिणी तर्फे वसई तहसीलदार यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावे निवेदन देण्यात आले. या निवेदनात प्रामुख्याने जाहिरात दरात १५०% वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे. सन २०१९ पासून आजतागायत जाहिरात दरांमध्ये कोणतीही सुधारणा झालेली नाही, त्यामुळे तात्काळ दरवाढ मंजूर करणे आवश्यक असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

निवेदनाद्वारे शासनाकडे इतरही महत्त्वपूर्ण मागण्या मांडण्यात आल्या आहेत. यामध्ये ई-टेंडर जाहिराती संक्षिप्त न देता पूर्ण स्वरूपात प्रसिद्ध करणे, शासकीय जाहिरातींचा किमान आकार २०० चौ.से. निश्चित करणे आणि जाहिरातींची देयके ३० दिवसांच्या आत अदा करणे यांचा समावेश आहे. देयके देण्यास विलंब झाल्यास त्यावर बँक दराने व्याज द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.

पत्रकारांच्या कल्याणासाठी देखील निवेदनात विशेष मुद्दे मांडले आहेत. यामध्ये २० वर्षे पत्रकारिता क्षेत्रात सेवा देणाऱ्या पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका देणे आणि ५५ वर्षे वय पूर्ण झालेल्या पत्रकारांना ‘शंकरराव चव्हाण पत्रकारिता पेन्शन निधी’चा लाभ मिळावा यासाठी निकष शिथिल करण्याची मागणी केली आहे. तसेच, लघु व मध्यम वृत्तपत्रांना मोठ्या वृत्तपत्रांप्रमाणेच जाहिरात वाटपात समान संधी व न्याय्य वाटा मिळावा, असेही निवेदनात नमूद केले आहे.
व्हॉइस ऑफ मीडियाचे पालघर जिल्हा अध्यक्ष नरेंद्र पाटील, महिला विंगच्या पालघर जिल्हाध्यक्ष सौ. सोनल प्रसाद महाडिक, सदस्य जयप्रकाश शर्मा आदीसह जिल्हा पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्रि, प्रधान सचिव आणि मुख्य सचिव यांनाही कार्यवाहीसाठी पाठवण्यात आल्या आहेत.