सुनील दैवे हत्याप्रकरणी संशयितांना अटक करा : संतप्त नागरिकांची मागणी:

नागरिकांसह तेली समाजाची मागणी : बोदवड येथील तहसील कार्यालय, पोलिस ठाण्यावर काढला भव्य मोर्चा

बोदवड (प्रतिनिधी)-शहरात काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून उफाळलेल्या मारहाणीच्या घटनेत गंभीर जखमी झालेल्या सुनील शामराव दैवे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने शहरात संतापाची लाट उसळली आहे. नागरिक, नातेवाईक आणि विविध सामाजिक संघटनांकडून आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.

. मिळालेल्या माहितीनुसार, साध्या वादातून सुरू झालेल्या या प्रकरणाने अचानक हिंसक वळण घेतले. आरोपींकडून झालेल्या बेदम मारहाणीत दैवे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने उपचार सुरू असतानाच काल रात्री त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाची बातमी समजताच शहरभर शोककळा पसरली.

दरम्यान, आज सकाळी संतप्त नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत आरोपींना त्वरित अटक करण्याची मागणी केली. काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. “या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल,” असे आश्वासन पोलिस प्रशासनाकडून देण्यात आले. त्यानंतर कुटुंबीयांनी मृतदेह स्वीकारला.

यानंतर सुनील दैवे यांच्यावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. शहरात सध्या तणावपूर्ण शांतता असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

दरम्यान, आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे

.बोदवड तेली समाज बहुउद्देशीय सेवा संस्थेने दिले निवेदन

स्व सुनील दैवे यांच्या हत्या प्रकरणातील उर्वरित आरोपींना अटक करावी. त्यांना कठोर शिक्षा द्यावी, या मागणीसाठी बोदवड तेली समाज बहुउद्देशीय सेवा संस्थेने २३ मार्चला दुपारी तहसील कार्यालय व पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला.

मोर्चा तहसील कार्यालय व पोलिस ठाण्यात आल्यावर संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यात ११ मार्च २०२६ रोजी सुनील श्यामराव दैवे यांना त्यांच्या घरासमोर काही संशयितांनी मारहाण केली होती, गंभीर जखमी अवस्थेत उपचार सुरू असताना १९ मार्चला त्यांचा मृत्यू झाला.

त्यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली होती. यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप निवेदनात केला आहे. दैवे यांच्या पश्चात दोन लहान मुली, पत्नी व वृद्ध आई असा परिवार आहे. त्यांची आर्थिक व मानसिक परिस्थिती बिकट झाली आहे.8

त्यामुळे सर्व आरोर्पीना अटक करून कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी समाजाने केले. निवेदनावर जगन्नाथ खेवलकर, कैलास जावरे, अशोक खेवलकर, रवींद्र. खेवलकर,यांच्यासह १०४ समाजबांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.