भुसावळ पालिकेत राजकीय संघर्ष तीव्र; भाजपाकडून तहकूब सभेची खातरजमा

भुसावळ (प्रतिनिधी )- भुसावळ सत्ता बदलानंतर भुसावळ नगरपालिकेतील राजकारण अधिकच तापल्याचे चित्र समोर आले आहे. सलग दोन सभा वादळी ठरल्यानंतर तिसरी सर्वसाधारण सभा देखील तिसऱ्यांदा तहकूब करण्याची वेळ सत्ताधाऱ्यांवर आली. यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे.

नगराध्यक्षांनी रविवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे विरोधकांवर विकासात अडथळे आणल्याचा आरोप केला होता. दरम्यान, 23 मार्च रोजी होणारी सभा अचानक स्थगित केल्याची माहिती सोशल मीडियावर देण्यात आली. मात्र, यावर विश्वास न ठेवता भाजपाचे 27 नगरसेवक नियोजित वेळेनुसार दुपारी चार वाजता पालिका सभागृहात दाखल झाले. त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून सभा तहकूब झाल्याची खातरजमा केली. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून सत्ताधाऱ्यांवरील अविश्वास स्पष्ट झाल्याची चर्चा आहे.

यापूर्वी 13 मार्च रोजी होणारी सभा निवेदनाच्या मुद्द्यावरून तहकूब करण्यात आली होती. त्यानंतर 17 मार्च रोजी पुन्हा सभा घेण्यात आली; मात्र माध्यमांना प्रवेश नाकारल्यामुळे आणि निवेदन स्वीकारण्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये तीव्र वाद झाला. परिणामी ती सभाही तहकूब करून 23 मार्चची तारीख जाहीर करण्यात आली होती.

दरम्यान, 3 फेब्रुवारीच्या सभेतील ठरावांवर भाजपाने आक्षेप घेत जळगाव जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी मंगळवार, 24 मार्च रोजी सकाळी 11 वाजता सुनावणी होणार असून या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम 1965 च्या कलम 308 अंतर्गत हे अपील दाखल करण्यात आले आहे.

भाजपाचे गटनेते युवराज लोणारी यांनी सांगितले की, “आमचा कायद्यावर पूर्ण विश्वास आहे. शहराचा विकास पारदर्शक पद्धतीने व्हावा, ही आमची अपेक्षा असून जनतेच्या पैशांचा अपव्यय होऊ देणार नाही.”

एकूणच, भुसावळ पालिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्षामुळे प्रशासनिक कामकाजावर परिणाम होत असून आगामी सुनावणीमुळे या वादाला कोणते वळण मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.