भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ नगर परिषदेत सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले असून तुरटी खरेदी प्रकरणावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटामध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. पाणीपुरवठा विभागासाठी करण्यात आलेल्या तुरटी खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी पत्रकार परिषद घेत भाजपच्या सत्ताकाळात भुसावळ नगर परिषदेत पाणीपुरवठा विभागासाठी करण्यात आलेल्या तुरटी खरेदीत मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप केला. या व्यवहाराची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
दरम्यान, या आरोपांनंतर भाजपकडूनही तातडीने पत्रकार परिषद घेण्यात आली. भाजपच्या नगराध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांनी चौधरी यांच्या आरोपांचा जोरदार समाचार घेत, हे आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले. ज्यांनी स्वतःच्या कारकिर्दीत घोटाळे करून जनतेचा विश्वास गमावला, तेच आता आरोप करत असल्याची टीकाही त्यांनी केली.
भाजप पदाधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, चौधरी यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य असल्यास त्यांनी ठोस पुरावे जनतेसमोर मांडावेत. केवळ राजकीय फायद्यासाठी केलेले आरोप जनता स्वीकारणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
या आरोप-प्रत्यारोपांमुळे भुसावळ नगर परिषदेत राजकीय वातावरण अधिकच तापले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तीव्र वाद निर्माण झाला आहे. येत्या काळात या प्रकरणावरून स्थानिक राजकारणात आणखी खळबळ उडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


