न्हावी (ता. यावल) – येथील लेवा पाटीदार समाजाचे कुलदैवत असलेले जागृत देवस्थान श्री मल्हारी मार्तंड खंडोबा रायांची यात्रा दि. २ मार्च मंगळवारी फाल्गुन शुद्ध १४, हुताशनी पौर्णिमा रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावर्षी पारंपरिक बारा गाड्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण होते.

परिसरातील कळमोदा, बोरखेडा बुद्रुक, मारूळ, आमोदा, बामणोद तसेच फैजपूर येथील भाविकांनी यात्रेदिवशी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. गेल्या दोन-तीन दिवसांपासून यात्रेची व बारा गाड्यांची तयारी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर केली होती. या संदर्भात देवस्थानाच्या आवारात बैठक घेऊन बारा गाड्यांचा कार्यक्रम करण्यास मान्यता देण्यात आली होती.
मंदिराचा इतिहास व विकास
मंदिराचा जिर्णोद्धार सन १९७६ मध्ये कै. ज्ञानदेव धोंडू चौधरी, कै. डोंगर शहादू बोरोले, कै. वेडू तुळशीराम चौधरी, भुसावळचे माजी नगराध्यक्ष कै. चिंतामणराव चौधरी आदी ग्रामस्थांच्या पुढाकारातून लोकवर्गणीतून करण्यात आला. जयपूर येथून खंडोबाची नवीन मूर्ती आणण्यात आली. कै. कौतिक सुपडू ठोंबरे यांनी मंदिराचा संगमरवरी दरवाजा बांधून दिला.
सन १९८९ मध्ये पीक संरक्षण संस्थेमार्फत श्री शनिदेव मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले असून त्याच ठिकाणी कालभैरव व महाकाली यांच्या मूर्ती विराजमान आहेत. मंदिर परिसराभोवती संरक्षण भिंतीची उंची वाढविण्याचे काम पूर्ण झाले आहे. सन २००९ मध्ये तत्कालीन जि.प. सदस्य शरद महाजन यांच्या हस्ते सभा मंडपाचे भूमिपूजन करण्यात आले होते. सध्या सभामंडप पूर्ण असून संपूर्ण परिसर शेडने आच्छादित करण्यात आला आहे, त्यामुळे पावसाळ्यातही कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडतात. मंदिरात पुजारी म्हणून चंद्रकांत गाजरे सेवा बजावत आहेत.
बारा गाड्यांची परंपरा
यात्रेला भव्य स्वरूप देण्यासाठी ग्रामस्थांनी बारा गाड्या ओढण्याची परंपरा सुरू केली आहे. पहिला मान गावातील चौधरी (बोंबले) घराण्यास जातो. कै. तोताराम शहादू चौधरी (जिरी) व कै. तुकाराम दशरथ मोरे (जोगी) यांनी सुमारे २६ वर्षे बारा गाड्या ओढल्या. त्यानंतर कै. भोजू बारी, कै. पुंडलिक कोळी, कै. मुरलीधर चौधरी, कै. जयराम नेमाडे, कै. भानजी बढे, कमलाकर कोलते आदींनी परंपरा जोपासली.
सुरेश धनगर यांनी २०१० ते २०२१ या सलग अकरा वर्षांत बारा गाड्या ओढल्या. कोरोना महामारीमुळे २०२१ मध्ये कार्यक्रम झाला नव्हता. २०२२ ते २०२४ दरम्यान चंद्रकांत पांडुरंग गाजरे यांनी भगत म्हणून बारा गाड्या ओढल्या. सन २०२५ मध्ये सुरेश धनगर यांनी ही मानाची जबाबदारी पार पाडली. यावर्षी भगत म्हणून लक्ष्मण कांचन साळुंके बारा गाड्या ओढल्या.

यात्रेदिवशी पहाटे पाच वाजता भगत लवाजम्यासह गावातून फेरी मारली, त्याला ‘नवरथ’ असे म्हटले जाते. यात्रेत विविध खेळणी, मिठाईची दुकाने व मनोरंजनाची साधने आकर्षण ठरली. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था
यात्रेच्या सुरक्षिततेसाठी माजी जि.प. सदस्य शरद महाजन, सरपंच देवेंद्र चोपडे, जिल्हा दूध संघाचे संचालक नितीन चौधरी, उपसरपंच चेतन इंगळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रतिष्ठित मंडळी, विविध संस्थांचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. तसेच फैजपूर पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला.
एकूणच, धार्मिक श्रद्धा, परंपरा आणि ग्रामएकतेचे दर्शन घडवणारी ही यात्रा उत्साहात व शांततेत पार पडली.


