भुसावळ नगरपालिका : जन्म-मृत्यू दाखले तात्काळ; ऑनलाइन सुविधा लवकरच

भुसावळ (प्रतिनिधी): शहरातील नागरिकांना जन्म, मृत्यू व विवाह नोंदणीसाठी वारंवार पालिकेच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत, यासाठी भुसावळ नगरपालिकेने कार्यपद्धतीत महत्त्वाचा बदल केला आहे. आता ज्या दिवशी अर्ज दाखल होईल, त्याच दिवशी संबंधित दाखला देण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तसेच लवकरच ऑनलाइन कार्यप्रणाली सुरू करण्यात येणार असून इतरही नागरी सेवा टप्प्याटप्प्याने पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध केल्या जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पालिकेतील ५१ कर्मचाऱ्यांना पेन्शन विक्रीअंतर्गत प्रत्येकी एक लाख रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. उर्वरित रक्कम फेब्रुवारी महिन्यात अंशतः आणि मार्च महिन्यात मागणीनुसार पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती माजी आमदार संतोष चौधरी यांनी दिली. नागरिकांच्या सोयीसाठी पारदर्शक व वेगवान प्रशासन देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

▢ चौकट

कोणतीही लाच देऊ नका!
भुसावळ नगरपालिकेमध्ये कोणत्याही कामासाठी पैशांची मागणी झाल्यास एक रुपयाही देऊ नये. अशा प्रकारची तक्रार असल्यास थेट नगराध्यक्षा, मुख्याधिकारी यांच्याकडे अथवा प्रसारमाध्यमांकडे कळवावे.