वरणगाव (प्रतिनिधी): वरणगाव शहर आणि परिसरातील महामार्गाशी संबंधित प्रलंबित प्रश्नांकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करत शिवसेना शिंदेगट पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.. शिवसेना शिंदेगट जिल्हाप्रमुख समाधान महाजन, राजेंद्र चौधरी, विधानसभा प्रमुख संतोष माळी यांच्यासह नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी NHAI जळगाव कार्यालयाला निवेदन देत तातडीने कार्यवाहीची मागणी केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास ‘शिवसेना स्टाईल’ने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

प्रमुख मागण्या आणि समस्या याप्रमाणे
दिशादर्शक फलकांचा अभाव :
सुमारे ५० हजार लोकसंख्या असलेल्या वरणगाव शहराचे नाव तरसोद ते मलकापूर दरम्यान महामार्गावर दर्शविणारे फलक नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे निवेदनात नमूद आहे.
प्रकाश व्यवस्थेची कमतरता :
भुसावळकडून वरणगावकडे येताना फुलगाव जवळील सर्व्हिस रोडवर वस्ती असूनही पथदिव्यांची सोय नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.
जंक्शनची गरज :
मुस्लिम कब्रस्तान व ऑर्डनन्स फॅक्टरीकडे जाणाऱ्या रस्त्यांसाठी अंडर बायपासजवळ योग्य जंक्शन नसल्याने वाहनधारकांना अडचणी येत आहेत. येथे नवीन जंक्शन उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. पाण्याचा निचरा व रस्ता दुरुस्ती :
फुलगाव येथील रेल्वे पुलाखालील रस्ता खराब झाला असून पावसाळ्यात पाणी साचते. कायमस्वरूपी निचऱ्याची व्यवस्था करून रस्ता तातडीने दुरुस्त करावा, अशी मागणी आहे. पिकअप शेड उभारणी :महात्मा ज्योतिबा फुले सर्कल परिसरात प्रवाशांच्या सोयीसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पिकअप शेड उभारण्यात यावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे.
प्रशासनाला गर्भित इशारा
वरणगाव हे जिल्ह्यातील महत्त्वाचे केंद्र असूनही महामार्ग प्राधिकरणाकडून मूलभूत सुविधांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. प्रशासनाने तातडीने दुरुस्तीची कामे सुरू न केल्यास जनतेच्या हितासाठी शिवसेना आपल्या खास शैलीत आंदोलन छेडेल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
यावेळी समाधान महाजन, राजेंद्र चौधरी, संतोष माळी, विलास मुळे, माजी नगरसेवक गणेश धनगर, नगरसेवक विनोद झोपे, रवि कोल्हे, शंकर लोखंडे यांच्यासह अनेक शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.


