शिवजयंतीनिमित्त जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेत काहुरखेडे शाळेच्या २८ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

भुसावळ (प्रतिनिधी) – शिवजयंतीनिमित्त अंतर्नाद प्रतिष्ठान, भुसावळ यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय महावक्तृत्व स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, काहुरखेडे (ता. भुसावळ) येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय सहभाग नोंदवित शाळेचा गौरव वाढविला. अवघी ६४ इतकी पटसंख्या असलेल्या शाळेतून तब्बल २८ विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

विद्यार्थ्यांच्या या सहभागाचे स्पर्धेला उपस्थित परीक्षक, पालक, शिक्षक तसेच अंतर्नाद प्रतिष्ठानच्या सदस्यांनी विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक समाधान जाधव, मुख्याध्यापिका उज्वला सुरवाडे आणि उपशिक्षिका ममता तडवी यांचेही अभिनंदन करण्यात आले.

अल्प पटसंख्या असलेल्या शाळेतून एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदविल्याने सर्व स्तरांतून समाधान व्यक्त करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासपूर्ण व प्रभावी सादरीकरण करत उपस्थितांची दाद मिळविली. त्यांच्या पुढील वाटचालीस मान्यवरांनी शुभेच्छा देत प्रोत्साहन दिले.

दरम्यान, शिवजयंतीनिमित्त शाळेत आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर प्रभावी भाषणे सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढविली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्व कौशल्याबरोबरच इतिहासाबद्दल अभिमान व प्रेरणा निर्माण झाल्याचे शिक्षकांनी सांगितले.

कार्यक्रमास सरपंच गीता पाटील, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, पालक व शाळा परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे, सहभागी विद्यार्थ्यांनी भुसावळ येथे तसेच सायंकाळी गावात आयोजित शिवजयंती व्याख्यान कार्यक्रमांमध्येही प्रभावी भाषणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

विद्यार्थ्यांची उत्कृष्ट तयारी करून घेतल्याबद्दल ग्रामस्थांनी मुख्याध्यापिका उज्वला सुरवाडे, शिक्षक समाधान जाधव व उपशिक्षिका ममता तडवी यांचे विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे काहुरखेडे शाळेचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.