भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी डॉ. सविता आंबेडकर (शारदा कबीर) यांचा जन्म २७ जानेवारी १९१२ रोजी झाला. त्यांचे वडील कृष्णराव कबीर हे सुरुवातीपासूनच पुरोगामी विचारसरणीचे होते. त्यांचे कुटुंब सारस्वत ब्राह्मण होते; मात्र जातीयता व अस्पृश्यता ते अजिबात मानत नव्हते. त्यांनी त्यांच्या सर्व मुला-मुलींची लग्ने अन्य जातींमध्ये लावलेली होती. या कौटुंबिक वातावरणाचा परिणाम बालमनापासून सविता ऊर्फ शारदा कबीर यांच्यावर झाला होता.

त्या काळात मुलीने शिक्षण घेणे, नोकरी करणे किंवा एखादा व्यवसाय करणे हे फार धाडसाचे मानले जात होते. असे असले तरी या कुटुंबातील सर्वच मुले-मुली शिक्षण घेत होती व विविध पदांवर काम करत होती.
बाबासाहेबांचे घराणे कबीरपंथी होते. कृष्णराव कबीर यांचे घराणेही कबीरपंथीच होते. सविता ऊर्फ शारदा कबीर यांना वाचनाची आवड असल्याने त्या क्रमिक अभ्यासाबरोबरच इतरही पुस्तकांचे वाचन करत असत. १९३७ साली त्यांनी एम.बी.बी.एस. चे शिक्षण पूर्ण करून त्या डॉक्टर झाल्या.
याच दरम्यान त्या आजारी पडल्या असता बौद्ध धर्मावरील काही पुस्तके त्यांच्या वाचनात आली. त्या पुस्तकांचा त्यांच्यावर इतका प्रभाव पडला की त्यांनी आणखी पुस्तके मागवून घेतली व त्या अधाश्यासारख्या वाचू लागल्या. घरात त्या बुद्ध व त्यांच्या तत्त्वांविषयी बोलू लागल्या. बौद्ध धर्माचा अभ्यास करत असतानाच त्यांनी एम.डी.ला प्रवेश घेतला.
आजारपणामुळे त्यांना एम.डी. पूर्ण करता आले नाही. आजारी असतानाच त्यांना गुजरात येथे मुख्य वैद्यकीय अधिकारी या मोठ्या पदाची नोकरी मिळाली; मात्र काही कारणांमुळे ती नोकरी त्यांना सोडावी लागली. त्यानंतर त्या पुन्हा डॉ. माधवराव मालवणकर यांच्याकडे कनिष्ठ डॉक्टर म्हणून काम करू लागल्या.
माईसाहेबांचे वडील मूळचे म्हैसूरचे होते. विलेपार्ले येथे म्हैसूरचे डॉ. राव हे अर्थतज्ज्ञ राहत होते. राव व कबीर हे जवळचे मित्र असल्याने ही दोन्ही कुटुंबे अधून-मधून एकत्र येत असत. डॉ. राव व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचीही चांगली मैत्री होती. त्यामुळे बाबासाहेब राव यांच्याकडे अधून-मधून येत असत.
१९४७ च्या सुरुवातीस बाबासाहेब डॉ. राव यांच्याकडे आले असता, त्याच दिवशी माईसाहेबही तिथे आलेल्या होत्या. त्या भेटीत डॉ. राव यांनी माईसाहेबांची ओळख बाबासाहेबांशी करून दिली. माईसाहेबांना बाबासाहेबांबद्दल बरीच माहिती होती; मात्र बाबासाहेबांना त्यांनी प्रथमच पाहिले होते.
बाबासाहेबांनी डॉ. राव यांच्यासोबत अर्थशास्त्राबरोबरच बौद्ध धर्मावरही चर्चा केली. ही चर्चा ऐकून माईसाहेब अत्यंत प्रभावित झाल्या. बौद्ध धर्माविषयी बाबासाहेबांचा प्रचंड अभ्यास आहे, हे त्यांच्या लक्षात आले आणि त्या बाबासाहेबांशी चर्चेत सहभागी होऊ लागल्या. पुढे पुढे या भेटी वाढत गेल्या व त्यांना बाबासाहेबांचे जीवन, कार्य, संघर्ष, आजारपण व भावी संकल्प कळत गेले.
बाबासाहेब डॉ. मालवणकर यांच्याकडे नियमित आरोग्य तपासणीस येत असत. तिथेच माईसाहेब नोकरीत असल्याने बाबासाहेबांना मधुमेह, रक्तदाब, सांधेदुखी, न्युरायटिस अशा विविध आजारांनी ग्रासले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांना नियमित औषधोपचार व योग्य आहार आवश्यक आहे, असे वाटल्याने माईसाहेबांनी औषधे, आहार व प्राणायाम याविषयी बाबासाहेबांना सविस्तर माहिती दिली. तसेच त्यांनी बाबासाहेबांना घरी त्यांच्या पत्नीला हे सर्व समजावून सांगण्याचा सल्ला दिला व गरज असल्यास स्वतः येऊन सांगण्याची तयारीही दर्शवली.
माईसाहेबांच्या या वाक्याने तेथील वातावरणच बदलून गेले. बाबासाहेबांच्या डोळ्यांत पाणी आले. त्यांनी आपली एकूण परिस्थिती कथन केली. ते ऐकून माईसाहेब गहिवरल्या व त्यांनी विचारले, “साहेब, मग तुमचे कसे होईल? तुमच्यावर इतक्या जबाबदाऱ्या आहेत. तुम्हाला खूप काही करायचे आहे; ते कसे होईल?”
या प्रसंगानंतर ते दोघे एकमेकांचा विचार करू लागले. पुढे बाबासाहेबांनी माईसाहेबांकडे थेट विवाहाची मागणी घातली. माईसाहेबांनी विचार करून उत्तर देते, असे सांगितले.
१९४७ साली माईसाहेबांचे वय ३५ वर्षे तर बाबासाहेबांचे वय ५६ वर्षे होते. मधुमेहामुळे बाबासाहेबांचे शरीर खूपच अशक्त झाले होते. १९२२ पासून त्यांना विविध आजारांनी ग्रासले होते. आजारपणामुळे त्यांना अनेकदा रात्रभर जागे राहावे लागत असे. गेल्या १२ वर्षांपासून ते एकाकी जीवन जगत होते.
कामाचा प्रचंड ताण, विविध जबाबदाऱ्या, समाजउन्नतीचा ध्यास व त्याला होणारा तीव्र विरोध — या सर्व बाबी लक्षात घेता बाबासाहेबांशी विवाह म्हणजे वैवाहिक जीवनाचे पूर्ण समर्पण होते. त्यामुळे बाबासाहेबांशी विवाह करण्यास माईसाहेबांनी दिलेली संमती ही त्यांच्या त्यागाची परिसीमा होती. बुद्धांनी सांगितलेल्या प्रेम, करुणा व मैत्रीच्या तत्त्वांचा तो विजयच होता.
विवाहानंतर माईसाहेबांनी बाबासाहेबांच्या तब्येतीची पूर्ण काळजी घेतलीच; शिवाय त्यांच्या सार्वजनिक कार्यालाही पूर्ण पाठबळ दिले. बाबासाहेब १९०७ पासून तर माईसाहेब १९३७ पासून बौद्ध विचारधारेशी जोडले गेले होते. आता विवाहबद्ध झाल्यानंतर ते बौद्ध धर्म स्वीकारण्याच्या मानसिकतेत आले. बौद्ध धर्म स्वीकारण्याचा त्यांचा निश्चय १९५० मध्येच झाला होता.
सिलोन (श्रीलंका) येथील यंग मेन्स बुद्धिस्ट असोसिएशन, कोलंबो यांनी बाबासाहेबांना बौद्ध धर्म परिषदेस आमंत्रित केले. या परिषदेत माईसाहेबही सहभागी झाल्या. दिल्ली येथे २ मे १९५१ रोजी आयोजित बुद्धजयंती कार्यक्रमात बाबासाहेबांसोबत माईसाहेबही उपस्थित होत्या. घरात त्यांनी बुद्धमूर्ती आणली. रोज त्रिसरण व पंचशील घेऊ लागल्या. प्रत्येक बौद्ध कार्यक्रमात त्या उत्साहाने सहभागी होत गेल्या.
बाबासाहेबांच्या संविधान लेखनाच्या कार्यातही त्यांनी अहोरात्र सहकार्य केले. धर्मांतराचा सोहळा यशस्वी करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. मात्र धर्मांतरानंतर दीड महिन्याच्या आत बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले आणि माईसाहेबांचे जीवन पूर्णतः उद्ध्वस्त झाले.
आंबेडकरी समूहातून त्यांच्यावर प्रचंड टीका झाली. जिवे मारण्याचे प्रयत्न झाले. त्या पूर्णपणे एकाकी पडल्या. यामुळे त्या मानसिक व शारीरिकदृष्ट्या खचल्या. पुढे दलित पँथरच्या नेत्यांना त्यांच्या अवस्थेबद्दल कणव वाटली. त्यांनी माईसाहेबांवर झालेले आरोप अभ्यासले व त्यात काहीही तथ्य नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी माईसाहेबांना पुन्हा सार्वजनिक जीवनात आणले.
यानंतर त्यांनी आंबेडकरी चळवळीत सक्रिय सहभाग घेण्यास सुरुवात केली. नामांतराचा प्रश्न, ‘रिडल्स’चा प्रश्न, बौद्ध आरक्षणाचा प्रश्न तसेच इतर अनेक प्रश्न त्यांनी ठामपणे लावून धरले.
अयोध्या येथील वादग्रस्त जागेचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात गेला असता, ही जागा बौद्ध वास्तू असल्याचा दावा त्यांनी न्यायालयात दाखल केला. अयोध्या व परिसरात भगवान गौतम बुद्ध यांचे १६ वर्षांचे वास्तव्य होते, हजारो बौद्ध भिक्खू येथे दीर्घकाळ राहत होते, याचे दाखले तसेच पुरातत्त्व विभागाच्या उत्खननात आढळलेल्या बाबी त्यांनी सादर केल्या. त्यांचा दावा सर्वोच्च न्यायालयाने दाखल करून घेतला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आंबेडकरी विचारधारा, आंबेडकरी चळवळ व बौद्ध धर्म यांच्याविषयी अतिशय एकनिष्ठ राहून या सर्वांसाठी आपल्या आयुष्याचा त्याग करणाऱ्या माईसाहेबांना त्यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन.
लेखक : जयसिंग वाघ
अजिंठा हाउसिंग सोसायटी,
अजिंठा चौक, जळगाव
संपर्क : ९८८१९२८८८१


