मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विवेक कुमार गुप्ता यांचे मनमाड–भुसावळ विभागाचे सखोल संरक्षितता निरीक्षण

भुसावळ (प्रतिनिधी):
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री. विवेक कुमार गुप्ता यांनी दिनांक १७ जानेवारी २०२६ रोजी भुसावळ विभागातील मनमाड–भुसावळ रेल्वे मार्गाचे सखोल संरक्षितता निरीक्षण केले. या दौऱ्यादरम्यान त्यांनी रेल्वेची सुरक्षितता, परिचालन कार्यक्षमता, वेळपालन तसेच सुरू असलेल्या पायाभूत व विकासात्मक कामांचा सविस्तर आढावा घेतला.

नांदगाव स्थानकावर विविध विभागांनी सादर केलेल्या संरक्षितता व विश्वासार्हता वाढविणाऱ्या अभिनव उपाययोजनांचे त्यांनी कौतुक केले. स्थानक इमारत, पॅनल रूम, तिकीट कार्यालय, प्रवासी सुविधा, क्रू लॉबी, रनिंग रूम्स, गुड्स शेड तसेच संरक्षा प्रदर्शनाची त्यांनी पाहणी केली. यावेळी विविध विभागांच्या संरक्षितता व देखभाल विषयक पुस्तिकांचे अनावरण करण्यात आले. तसेच Self-Propelled Accident Relief Train, “निवारण” ॲप, ब्रेकिंग पॅटर्न सिस्टिम ॲप व शंटर सेफ्टी ॲपचे उद्घाटन/प्रकाशन करण्यात आले.

पिंपरखेड येथे ट्रॅक्शन सब-स्टेशन (TSS) ची तपासणी करताना ट्रान्सफॉर्मर व देखभाल पद्धतींचा आढावा घेण्यात आला.
हिरापूर येथे गँग युनिट, टर्नआऊट, लाँग वेल्डेड रेल्स व स्विच एक्स्पान्शन जॉइंट्सची तपासणी करून ट्रॅकमन हँडबुक व टूल बॉक्स टॉक पुस्तिकांचे अनावरण करण्यात आले.

तसेच चाळीसगाव–वाघळी व काजगाव–नागर्देवळा विभागातील लेव्हल क्रॉसिंग, वक्र मार्गांची तपासणी करण्यात आली. नागर्देवळा–गलन विभागातील तितूर गिर्डर पुल व गलन–पाचोरा विभागातील मर्यादित उंचीच्या सब-वेचीही पाहणी करण्यात आली.

पाचोरा स्थानकावर स्थानक परिसर, रेल्वे आरोग्य केंद्र, वसाहत व इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणालीची तपासणी करून “संकेत सहाय्यक” पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले.
भुसावळ येथे रूटीन ओव्हरहॉलिंग शेड, ओएचई डेपोची पाहणी करत २x२५ केव्ही मॉडेल तसेच नवीन अधिकारी विश्रामगृहाचे उद्घाटन करण्यात आले.

महाव्यवस्थापकांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधत संरक्षा, देखभाल, गुणवत्ता व प्रशिक्षण (SMQT) यावर विशेष भर देण्याचे निर्देश दिले. अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत नांदगाव व पाचोरा स्थानकांवरील कामांचा आढावा घेत प्रवासी सुविधांची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

या दौऱ्यात श्री. पुनीत अग्रवाल, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, भुसावळ विभाग तसेच मुख्यालय व विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महाव्यवस्थापकांनी सुरक्षित रेल्वे परिचालन, विश्वासार्ह पायाभूत सुविधा आणि प्रवासी-केंद्रित सेवांच्या माध्यमातून भारतीय रेल्वेची प्रतिमा अधिक उंचावण्याचे आवाहन केले.