भुसावळ ( उज्वला बागुल ) – भुसावळ हे जसं रेल्वेचं जंक्शनतसचं ते सांस्कृतिक चळवळीचंही आहे. अलिकडे समाजमाध्यमांचा वापर प्रचंड वाढला. मराठी माणसांची सांस्कृतिक व वैचारीक भूक भागवणाऱ्या व्याख्यानमालांना ओहाेटी लागल्याचा सध्याचा हा काळ. खरे सांगायचं झालं तर एकाचवेळी हजाराेंच्या जनसमुदायाला विचारविश्वात नेऊन विचारप्रवृत्त करणाऱ्या व्याख्यानाला या महाराष्ट्राचं वैचारीक भूषण मानलं जातं. अलिकडे हे उपक्रम कमी हाेऊ पाहाताहेत हे मान्य. मात्र, असे असले तरी भुसावळच्या जय गणेश फाउंडेशनतर्फे गेल्या दहा वर्षांपासून द्वारकाबाई कालिदास नेमाडे यांच्या स्मरणार्थ ‘द्वारकाई’ फिरती व्याख्यानमाला आयाेजित केली जाते आहे. माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, समन्वयक गणेश फेगडे यांनी हे शिवधनुष्य खांद्यावर घेतलं आहे. स्वर्गीय अरुण मांडाळकर यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाची मुहूर्तमेढ दहा वर्षांपूर्वी झाली हाेती. यंदा तिचे अकरावे वर्ष आहे. एका गाेष्टीचा इथं आवर्जून उल्लेख करावा लागेल ताे म्हणजे काेराेनाच्या काळातही हा उपक्रम थांबला नाही. समाजमाध्यमांचा वापर करून त्या काळात ही व्याख्यानमाला ऑनलाइन घेण्यात आली हाेती. या माध्यमातून ती जगभरात पाेहाेचली.

विद्यार्थ्यांचे कान तयार करणारा उपक्रम
शहरातल्या एका सभागृहात सायंकाळी व्याख्यान आयाेजित करायचे. श्राेत्यांना तिथे बाेलवायचे. जाेपर्यंत अपेक्षित गर्दी हाेत नाही ताेपर्यंत कार्यक्रम रेंगाळायचा असे पूर्वीचे व्याख्यानमालांचे स्वरुप हाेते. मात्र, द्वारकाई व्याख्यानमाला त्याला अपवाद आहे. कारण हा फिरता उपक्रम आहे. दरवर्षी तीन किंवा चार शाळा निवडायच्या. त्यात विद्यार्थी श्राेते असतात. त्यांच्यापर्यंत वक्त्याला घेऊन जायचे. शाळेतले विद्यार्थी, शिक्षक, पालक, ज्येष्ठ नागरीक, महिला यांनी हे व्याख्यान ऐकायचे असा हा साधा आणि साेपा पण हटके असा उपक्रम आहे. गेल्या दहा वर्षांपासून आयाेजकांनी हा शिरस्ता कायम ठेवला आहे. त्यांचे अनुकरण करून गेल्या तीन वर्षांपासून आता जिल्ह्यात अनेक संस्था या अशी फिरती व्याख्यानमाला आयाेजित करताहेत. अर्थात, नाविन्यपूर्ण बदलाची सुरुवात जय गणेश फाउंडेशनने भुसावळात केली हे अभिमानास्पद आहे. गेल्या दहा वर्षात या संस्थेने चांद्यापासून ते बांद्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकाेपऱ्यातील ४० वक्ते भुसावळात आणले. विद्यार्थ्यांपर्यंत त्यांना नेऊन व्याख्यानमालांची अभिरुची निर्माण केली. म्हणून आता दरवर्षी किमान आठ ते दहा शाळा या फाउंडेशनकडे आमच्या शाळेत व्याख्यानमाला आयाेजित करा अशी विनंती करतात. त्यामुळे दरवर्षी शहरात हाेणाऱ्या तीनपैकी आता दाेन व्याख्याने भुसावळातील शाळांत आणि एक ग्रामीण भागातील शाळेत घेतले जाते आहे.
वर्तमानाशी सांगड घालणारी विषय निवड
द्वारकाई व्याख्यानमालेत वर्तमानाशी सांगड घालणाऱ्या विषयांची निवड केली जाते. पूर्वी भुसावळात ज्या व्याख्यानमाला आयाेजित केल्या जायच्या त्यात सेलिब्रिटी किंवा पन्नाशीच्या पुढील वक्त्यांना निमंत्रित केले जायचे. त्यामुळे तरुण, विद्यार्थी वर्गाचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसे ही वस्तुस्थिती असून ती नाकारता येणार नाही. मात्र, गर्दीचे मानसशास्त्र आणि फाउंडेशनच्या काेअर टीमने एक सर्वे करून त्यात जे निष्कर्ष आले त्याचा अभ्यास करून ही फिरती व्याख्यानमाला सुरू केली. त्यात निमंत्रत केले जाणारे वक्ते हे शक्यताेवर तरुण व मध्यमवयीन असतात. दरवर्षी एक महिला वक्ता बाेलवण्याचाही प्रयत्न केला जाताे. खरं सांगायचं झालं तर या शहरात कवितेची अभिरुची वाढवून जाे नवीन रसिक वर्ग तयार झाला आहे त्याचे श्रेय या फाउंडेशनच्या व्याख्यानमाला उपक्रमालाच जाते. सध्याच्या युगात व्याख्यानाला येणारी प्रत्येक व्यक्ती विचारांचं संचित घेऊन व्याख्यानमालेतून बाहेर पडेल, असं म्हणणं धाडसाचं ठरेल. तरीही, प्रत्येक क्षेत्रातील हौशे-नवशे वगळले, तर उर्वरित बहुसंख्यांना व्याख्यानाची मांडणी, त्यातून वक्त्यानं मांडलेला विचार, त्याचा अभ्यास, श्रोत्यांना खिळवून ठेवण्याची शैली अशा विविध गोष्टी पसंत पडत असतात. तसेच, एखाद्या वक्त्याचे भाषण चांगले झाले, ते उपस्थितांना आवडले, तर त्या वक्त्याला पुढच्या काळात पुन्हा आमंत्रित केले असता, मिळणारा प्रतिसादही उत्साहवर्धक असतो.
इतर संस्थाही नवतेत घालताहेत भर
अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फेही गेल्या पाच ते सहा वर्षांपासून ‘पुष्पांजली’ व्याख्यानमाला आयाेजित केली जाते. तिलाही चांगला प्रतिसाद मिळताे आहे. आजच्या घडीला या दाेनच व्याख्यानमाला भुसावळात अविरत सुरू आहेत. नाट्य क्षेत्रात उत्कर्ष कलाविष्कार संस्थेतर्फे एक ते दीड दशकापासून प्रायाेगिक खान्देश नाट्यमहाेत्सव घेतला जाताे आहे. स्नेहयात्री प्रतिष्ठान ‘स्नेहयात्री’ करंडक एकांकिका स्पर्धा घेते. महाराष्ट्रभरातून त्यात प्रवेशिका येतात. ब्राह्मण संघाच्या माध्यमातूनही नाट्यचवळीला बळ दिले जाते आहे. बालनाट्य स्पर्धेत श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ संचलित अहिल्यादेवी कन्या विद्यालय व महाराणा प्रताप विद्यालयाच्या वतीने एकांकिका सादर केल्या जातात. मध्यंतरी अंर्तनाद प्रतिष्ठानने पुणे, मुबंई, नाशिक शहराच्या धर्तीवर ‘शनिवार कट्टा’ उपक्रम सुरू केला हाेता. कथा, कविता, कादंबरी, नाटक, संगीत या विषयावर त्यात मंथन हाेत असे. मात्र, कालाैघात हा चांगला उपक्रम बंद पडला. कालिदास करंडक एकांकिका स्पर्धेने राज्यात वेगळा ठसा उमटवला हाेता. पण ही स्पर्धाही बंद पडली. तीन वर्षांपूर्वी जय गणेश फाउंडेशनने ‘कालिदास बहुभाषिक काव्य महाेत्सव’घेतला. त्याला सहाशे ते सातशे रसिकांची उपस्थिती लाभली हाेती. वेगळा श्राेतावर्ग या माध्यमातून तयार करण्यात त्यांना यश आले. मात्र, त्यात गेली दाेन वर्षे खंड पडला. भुसावळचं सांस्कृतिक वैभव पुन्हा तेजाळण्यासाठी अशा उपक्रमांना उर्जितावस्था मिळणे अपेक्षित आहे. कारण शहरात हाेणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमावरून आपल्या शहराची सांस्कृतिक इयत्ता कळत असते.
उज्ज्वला बागुल, भुसावळ


