जळगाव – महाराष्ट्र प्रदेश तेली महासंघाच्या जळगाव जिल्हा शाखेतर्फे रविवार, २७ जुलै २०२५ रोजी दुपारी १२ वाजता स्टार पॅलेस हॉटेल, नवीन बसस्थानकजवळ, येथे तेली समाजाची विशेष महासभा आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ झाला. जिल्हाध्यक्ष दत्तात्रय तुकाराम चौधरी यांच्या पुढाकाराने आयोजित या बैठकीत समाजाच्या एकात्मतेसह भविष्यातील दिशा व विकासाबाबत सखोल चर्चा झाली.

कार्यक्रमाची सुरूवात संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यानंतर प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांनी समाजबांधवांशी संवाद साधत, समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. यावेळी पंचमंडळाच्या ३५० सदस्यांबरोबरच महासंघाचे पदाधिकारी व समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीत लवकरच राज्य पातळीवर परिषद घेण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली. ही परिषद समाजात परिवर्तन घडवून आणण्यासाठी निर्णायक ठरेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला. पारंपरिक प्रथा व रूढी याकडे काळानुसार बघून, आवश्यक त्या सुधारणा करण्यावर भर देण्याचा ठराव यावेळी करण्यात आला. अपेक्षित आहे की या परिषदेत संपूर्ण महाराष्ट्रातून एक लाखांहून अधिक समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहतील.
या वेळी जळगाव जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष व पंचमंडळ अध्यक्षांचा विजय चौधरी व दत्तात्रय तुकाराम चौधरी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष दत्तात्रय तुकाराम चौधरी, उपाध्यक्ष विनोद चौधरी, अॅड. वसंत भोलाणे, सेवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बी.एम. चौधरी, नंदू चौधरी, सिताराम देवरे, अनिल चौधरी, अशोक चौधरी, प्रशांत शिंदे, प्रशांत सुरळकर, शामकांत चौधरी, अशोक नामदेव चौधरी आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल रामदास चौधरी पाटील यांनी तर आभार प्रदर्शन अशोक नामदेव चौधरी यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशामध्ये युवक मंडळातील कार्यकर्त्यांनी मोलाची भूमिका बजावली आणि अथक परिश्रम घेतले.


