भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळळात कला, साहित्य, संस्कृती, शिक्षण अशा नानाविध अशा क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत. त्यात ‘समाजासाठी समर्पित’ हे बिरूद घेऊन येथील जय गणेश फाउंडेशन गेल्या 20 वर्षांपासून सेवाभावी काम करीत आहे. फाउंडेशनचे संस्थापक तथा माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांच्या मातोश्री स्वर्गीय द्वारकाई कालिदास नेमाडे यांच्या स्मरणार्थ फाउंडेशनतर्फे दरवर्षी शाळा, महाविद्यालयात द्वारकामाई फिरती व्याख्यानमाला आयोजित केली जाते. यंदा या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे 11वे वर्ष आहे. त्यात यंदा 29 जुलै रोजी पुण्याच्या संत साहित्य अभ्यासिका प्रा. अश्विनी टाव्हरे, 31 जुलै रोजी नाशिकचे कवी राजेंद्र उगले, 2 आगस्ट रोजी सांगलीचे कवी नितीन चंदनशिवे हे विचारपुष्प गुंफणार आहेत.

सांस्कृतिक मेजवानी भुसावळकर रसिकांना तीन दिवस मिळेल. नवा रसिक वर्ग निर्माण करून अभिरूची वाढवणारा असा हा उपक्रम आहे. आयोजन, नियोजन, प्रचार, प्रसार तंत्र शिकायचं असेल तर प्रत्येक कला क्षेत्रातील व्यक्तींनी जय गणेश फाउंडेशनचा अभ्यास करायला हवा. त्यांची संपूर्ण टीम शांत व मृदू स्वभावाची आहे. म्हणून राज्यभर सोशल मीडियावर त्यांचे हजारो चाहते आहेत. द्वारकाई व्याख्यानमाला उपक्रमाची दशकपूर्ती गेल्यावर्षी झाली. त्यात मला एक विचारपुष्प गुंफण्याचा मान मिळाला होता. प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. नाशिकच्या वसंत व्याख्यानमाला सारखा हा उपक्रम अविरत सुरू राहो आणि भुसावळच्या सांस्कृतिक चळवळीचा मानदंड ठरो अशा आमच्या शुभेच्छा.
…….. डॉ. मिलिंद बागुल, जळगाव


