भुसावळ (प्रतिनिधी) –
दावत-ए-इस्लामी इंडियाची सामाजिक सेवा संस्था गरीब नवाज रिलीफ फाउंडेशन (GNRF) तर्फे संपूर्ण भारतात “पौधा लगाना है दरख़्त बनाना है” या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या भव्य वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत आज भुसावळ शहरातील मुस्लिम कॉलनी मध्ये वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमात दावत-ए-इस्लामीचे राष्ट्रीय सदस्य हाजी सलीम अत्तारी, समाजसेवक हाजी शरीफ ठेकेदार, तसेच माजी नगरसेवक हाजी साबीर शेख यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

या प्रसंगी बोलताना हाजी सलीम अत्तारी म्हणाले की,
जीएनआरएफने पर्यावरण रक्षणाचा आणि तापमानवाढीवर उपाय करण्याचा उद्देश ठेवून संपूर्ण भारतभर शाळा, महाविद्यालये, धार्मिक संस्था, मशिदी व सार्वजनिक ठिकाणी लाखो झाडे लावण्याचे लक्ष्य ठेवले आहे. केवळ झाडे लावणे नव्हे, तर त्यांना झाड बनवून त्यांची देखभाल करणे हे देखील महत्त्वाचे आहे.”
ते पुढे म्हणाले की, इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद ﷺ यांनी सांगितले आहे:
जो कोणी झाड लावतो आणि त्याचा फायदा एखाद्या मानवाला किंवा प्राण्याला होतो, तो त्याच्यासाठी कायमचा पुण्य (सदका-ए-जरिया) बनतो.”(तफसीर कबीर, खंड ६, पृष्ठ ३६७)
ही मोहीम केवळ एक धार्मिक कर्तव्य नसून, भविष्यातील पिढ्यांसाठी हरित व सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
जीएनआरएफचे कार्यकर्ते “निसर्ग वाचवा” या विषयावर शैक्षणिक व धार्मिक संस्थांमध्ये जनजागृती करत आहेत. त्यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले की,
तुमच्याही परिसरात एक तरी झाड लावा, कारण रोप लावणे पुरेसे नाही, त्याचे झाडात रूपांतर होईपर्यंत काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे.”
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दावत-ए-इस्लामीचे जळगाव जिल्हाध्यक्ष जुबेर अत्तारी, जीएनआरएफ जिल्हाध्यक्ष रफीक रोशन कादरी, भुसावळ शहर निरीक्षक अब्दुल सईद, हाजी शाकीर, युसूफ खान, जहांगीर शेख, आसिफ शेख, फरीद शेख, अजहर कादरी, इंजिनीयर इम्रान शेख, साबीर मणियार, शोएब अत्तारी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.


