भुसावळ ( २८जुलै प्रतिनिधी ) – : शहरातील जय गणेश फाउंडेशनने द्वारकाबाई कालिदास नेमाडे यांच्या स्मरणार्थ तीन दिवसीय फिरती व्याख्यानमाला आयाेजित केली आहे. यंदा या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे अकरावे वर्ष आहे. त्यात २९, ३१ जुलै आणि २ ऑगस्ट असे तीन पुष्प गुंफले जातील. संस्कार, ज्ञानरंजन, जाणिवा अशा तीन विषयांचा त्रिवेणी संगम वक्त्यांच्या व्याख्यानातून भुसावळकर रसिकांना अनुभवता येतील.
प्रथम पुष्प अहिल्यादेवी कन्या विद्यालयात २९ जुलै राेजी दुपारी १२ वाजता पुण्याच्या प्राध्यापिका अश्विनी टाव्हरे या गुंफतील. ‘कळी उमलताना आवश्यक संस्कार’ हा त्यांचा विषय आहे. द्वितीय पुष्प दादासाहेब आर. जी. झांबरे माध्यमिक विद्यालयात ३१ जुलै राेजी सकाळी ९ वाजता नाशिकचे राजेंद्र उगले हे गुंफतील. ‘मुक्काम पाेस्ट आनंदनगर : किस्से, कविता, गाणी, गप्पा’ हा त्यांचा विषय आहे. तृतीय पुष्प कुऱ्हे पानाचे येथील रा. धाें. माध्यमिक विद्यालयात २ ऑगस्ट राेजी सकाळी ९ वाजता सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळचे कवी नितीन चंदनशिवे हे गुंफतील. ‘माझी कविता माझं जगणं’ हा त्यांचा विषय आहे. दरवर्षी या व्याख्यानमालेचे तिन्ही पुष्प भुसावळ शहरातील शाळांमध्ये गुंफले जायचे. मात्र, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील वक्त्यांची व्याख्याने ऐकण्यासी संधी मिळावी आणि त्यांना गाेडी लागावी यासाठी गेल्या वर्षापासून एक पुष्प भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथे गुंफले जाते. वक्त्यांना थेट शाळेत नेऊन विद्यार्थी, शिक्षक, पालक, नागरिकांशी संवाद घडवून आणायचा असा हा उपक्रम आहे. काेराना काळातही हा उपक्रम खंडीत झाला नव्हता. तेव्हा त्याचे स्वरुप ऑनलाइन हाेते. कथाकथन, कविता, गझल, व्यक्तीमत्व विकास, अध्यात्म असे नानाविध विषय या व्याख्यानमालेतून हाताळले जाताहेत. माय, माती, माणूस अशी या व्याख्यानमालेची मध्यवर्ती संकल्पना आहे, असे फाउंडेशनचे संस्थापक तथा माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, समन्वयक गणेश फेगडे, फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र यावलककर यांनी सांगितले.



