शाळेत दिवसातून तीन वेळा हजेरी घ्या : शिक्षण विभागाचे आदेश;

मुंबई – शालेय शिक्षण विभागाने नवे नियम आणि सूचना जारी केल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी संबंधित शाळेवरच राहणार आहे. या अंतर्गत शाळांमधील विद्यार्थ्यांची हजेरी दिवसातून तीन वेळा घेतली जाणार आहे. असे आदेशचं शिक्षण विभागाने दिले आहेत. तसेच गैरहजर विद्यार्थ्यांची माहिती त्वरित पालकांना कळवा, अनेक ठिकाणी विद्यार्थी अपडेट नाहीत, पोर्टलवर दिलेल्या माहितीत साम्य नसेल तर कारवाई केली जाईल, अशा सूचनाही देण्यात आल्याची माहिती स्थानिक शिक्षकांनी दिली.

न्यायालयाच्या आदेशानुसार माजी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या शिफारशींनुसार सकाळी, दुपारी व संध्याकाळी विद्यार्थ्यांची हजेरी घेतली जाणार आहे. ही प्रक्रिया दिवसातून तीन वेळा हजेरी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.यामध्ये गैरहजर असलेल्या विद्यार्थ्यांची पालकांना त्वरित एसएमएसद्वारे माहिती दिली जाणार आहे.

या आदेशाची विद्यार्थ्यांना माहिती द्यावी, शाळेच्या भिंतीवर सुरक्षेविषयी माहिती देणारे फलक, चित्रे किंवा डिजिटल बोर्ड लावावेत. विद्यार्थ्यांवर मानसिक ताण येऊ नये म्हणून समुपदेशकाची नियुक्ती करावी. खासगी शाळांनी पात्र व अनुभवी समुपदेशक नियुक्त करणे, पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळांमध्ये चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श यासंबंधी प्रात्यक्षिके आयोजित करावीत. नियमांचे पालन न करणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.