भुसावळात शहर वाहतूक शाखेची विशेष मोहिम : 162 केसेसद्वारे पावणे दोन लाखांचा दंड वसुल –

भुसावळ (प्रतिनिधी ) : शहरात पोलिस प्रशासनातर्फे शहरात शुक्रवारी नाकाबंदी करण्यात आली होती. यामुळे पोलिसांकडून वाहनांची कसून तपासणी केली जात होती. शहरातील गांधी पुतळा, हंबर्डीकर चौक, नहाटा चौफुली, जळगाव रोड आदी ठीकाणी शहर वाहतूक शाखेतर्फे शुक्रवारी 13 जून रोजी राबवलेल्या विशेष मोहिमेत मोटार वाहन कायद्यानुसार नियमभंग करणार्‍या वाहनचालकांविरुद्ध कडक कारवाई करण्यात आली. एकूण 162 वाहनधारकांवर प्रकरणांमध्ये 1 लाख 76 हजार 200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

शहरातील विविध भागात पोलिसांनी नाकाबंदी करीत वाहनांची कसून तपासणी केली. वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक उमेश महाले यांनी दिलेल्या माहितीनुसार, महामार्गावर विनाहेल्मेट दुचाकी चालवणार्‍या 62 चालकांवर कारवाई करत त्यांच्याकडून प्रत्येकी 1 हजार रुपये प्रमाणे एकूण 62 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. तसेच फॅन्सी नंबर प्लेट लावणार्‍या 16 वाहनचालकांकडून प्रत्येकी 500 रुपये प्रमाणे 8 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच, इतर मोटार वाहन कायद्यानुसार नियमभंग करणार्‍या 99 जणांवरही कारवाई करत 1 लाख 6 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. यामध्ये सिग्नल तोडणे, ओव्हरलोड वाहतूक, योग्य कागदपत्रांचा अभाव, राँग साईडने वाहन चालवणे अशा प्रकारांचा समावेश आहे.

याशिवाय, ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह अर्थात मद्यप्राशन करून वाहन चालवणार्‍या 4 चालकांविरुद्धही कारवाई करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयात हजर राहण्याबाबत सूचीत केले आहे.

वाहतूक शाखेने नागरिकांना विनंती केली आहे की, वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित प्रवास सुनिश्चित करावा,अन्यथा अशाच कठोर कारवाया पुढेही करण्यात येणार आहेत.

डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांनी शहरातील विविध पॉइंटवर जात नाकाबंदीची माहिती घेतली. विशेष करून तीन सीट व अल्पवयीन मुले जी वाहने चालवितात त्यांच्याविरूध्द कारवाई करण्यावर भर देण्यात आला आहे.