भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ विभागातर्फे प्रथमच विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इति पांडेय यांच्या मार्गदर्शनाखाली दहावी व बारावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमात एकूण ९१ गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, मेडल, सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा उपक्रम राबवण्यात आला, ज्यातून पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.
पर्यावरण दिनानिमित्त चित्रकला, निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धांमध्ये यशस्वी ठरलेल्या २० विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इति पांडेय यांनी उपस्थित राहून सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्कार प्रदान केले व त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी आपल्या भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांनी मेहनत, प्रामाणिकपणा आणि निसर्गप्रेम यांचा समतोल राखत समाजाच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन केले.
यावेळी अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (प्रशासन) श्री सुनील कुमार सुमन, अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (तांत्रिक) श्री एम. के. मीना, मुख्य चिकित्सा अधीक्षक, तसेच वरिष्ठ शाखा अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




