भुसावळ – प्रत्येक मूल शिकले पाहिजे यासाठी त्याची अध्ययनाचे गती वाढवण्यासाठी प्रत्येक शिक्षकांची क्षमता वृद्धी होणे गरजेचे आहे. शिक्षकांचे सक्षमीकरण झाल्यास विद्यार्थ्यांच्या क्षमता व कौशल्य देखील वाढतील. याचा सर्वात जास्त आनंद शिक्षकांना होणार असल्याने शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण निर्मिती तज्ज्ञ डॉ. जगदीश पाटील यांनी येथे केले.

भुसावळ येथील पुंडलिक गणपत बऱ्हाटे विद्यालयात सुरू असलेल्या प्रशिक्षणाला डॉ. जगदीश पाटील यांनी भेट देऊन प्रशिक्षणार्थी शिक्षकांशी संवाद साधला. प्रारंभी प्रशिक्षण समन्वयक सचिन पाटील यांनी डॉ. जगदीश पाटील यांचे स्वागत केले. केंद्रप्रमुख निलेश पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी तज्ज्ञ मार्गदर्शक अशोक तायडे, सुनील वानखेडे, जीवन महाजन, निलेश पाटील, अल्पेश कुंभारे, गुणवंत पाटील, रवींद्र पढार, राहूल भारंबे यांची उपस्थिती होती. डॉ. जगदीश पाटील म्हणाले की, आधुनिक जगात अद्ययावत राहण्यासाठी आपल्याला वेळोवेळी अनेक बाबी शिकाव्या लागतील. त्यासाठी शिक्षक सक्षमीकरण आवश्यक आहे. अभ्यासक्रम, अध्ययन-अध्यापन आणि मूल्यमापन या तिन्ही बाबी क्षमतांवर आधारित असल्याने आपल्याला विद्यार्थ्यांशी आंतरक्रिया करताना क्षमतांचा विचार करावा लागेल. प्रत्येक मुलाच्या शिकण्याचा विचार करत असताना त्याचे अध्ययन सहज, सोपे व सुलभ होण्यासाठी आपल्याला समुपदेशक व सदुपदेशक व्हावे लागेल. त्याकरिता शिक्षणक्षेत्रात आलेल्या नवनवीन प्रवाहांचा आपल्याला स्वीकार करण्यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे. शिक्षकांची क्षमतावृद्धी झाल्यास विद्यार्थ्यांचे अध्ययन गतिमान होईल आणि विद्यार्थी यशस्वी झाल्यास याचा सर्वात जास्त आनंद शिक्षकाला होत असतो. त्यामुळे शिक्षक क्षमतावृद्धी हे प्रशिक्षण आनंदाची प्राप्ती करणारे ठरणार असल्याचेही त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.



