नाशिकमध्ये भीषण अपघात : पिता-पूत्रांसह पाच जण जागीच ठार –


नाशिक : नाशिकमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. भाविकांचा टेम्पो लोखंडी सळई वाहून नेणार्‍या ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात सिडको भागातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पिता-पूत्राचाही समावेश आहे. रविवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास हा अपघात द्वारका चौकाच्या अलीकडे घडला
नाशिक शहरातील सिडको सह्याद्रीनगरमधील रहिवासी असलेले चेतन गंभीरे यांच्या घरी धार्मिक कार्यक्रम (कारण) आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी रविवारी सकाळी परिसरातील महिला व पुरूष हे दोन स्वतंत्र टेम्पोमधून प्रवास करून नैताळे गावाच्या पुढे असलेल्या धारणगाव येथील धार्मिकस्थळी गेले होते. सायंकाळी कार्यक्रम आटोपून परतीचा प्रवास करताना अगोदर महिला भाविकांना घेऊन टेम्पो नाशिकच्या दिशेने रवाना झाला. हा टेम्पो सह्याद्रीनगर येथे पोहचून काही वेळ होत नाही, तोच पुरूषांचा टेम्पो (एम.एच.15 एफ.व्ही 5601) हा द्वारका चौकाच्या अलीकडे उड्डाणपूलावर लोखंडी सळई वाहून नेणार्‍या ट्रकवर (एम.एच.25 यू.0508) वर आदळला. अपघातात टेम्पोचा चक्काचूर होवून कॅबिनमध्ये लोखंडी सळ्या शिरल्याने पाच जणांचा मृत्यू झाला.
या भीषण अपघातात संतोष मंडलिक (56), अतुल संतोष मंडलिक (22) या पितापूत्रांसह यश खरात, दर्शन घरटे, चेतन पवार यांचा जागीच मृत्यू झाला. मयत हे सिडको भागातील रहिवासी असल्याने या भागात शोककळा पसरली.
या अपघातात सार्थक (लकी) सोनवणे, प्रेम मोरे, राहुल साबळे, विद्यानंद कांबळे, समीर गवई, अरमान खान, अनुज घरटे, साई काळे, मकरंद आहेर, कृष्णा भगत, शुभम डंगरे, अभिषेक, लोकेश (दोघांची पुर्ण नावे समजू शकलेले नाही) जखमी झाले.